Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरबा, दांडियासाठी लाऊडस्पीकर, डीजेची आवश्यकता नाही - उच्च न्यायालय 

By दीप्ती देशमुख | Updated: September 30, 2022 15:06 IST

नवरात्रीची पूजा इतरांना त्रास न देता व्हावी

मुंबई : नवरात्रीच्या काळात आदिशक्तीची पूजा केली जाते. त्यासाठी ध्यान करावे लागते आणि ध्यान लावणे गोंगाटात शक्य नसते. त्यामुळे गरबा, दांडियासाठी डीजे, लाऊडस्पीकर यांसारख्या अत्याधुनिक साउंड सिस्टीमची आवश्यकता नाही असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीच्या भक्तांच्या पूजेत व्यत्यय येत असेल किंवा स्वतः भक्त व्यत्यय आणत असेल तर देवीची पूजा होऊ शकत नाही, असे न्या. सुनील शुक्रे व न्या. गोविंद सानप यांनी म्हटले. 

'दांडिया आणि गरबा हे धार्मिक उत्सवाचा अंगभूत भाग असल्याने अजूनही पूर्णपणे पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीने सादर केले जाऊ शकतात. त्यासाठी लाऊडस्पीकर, डीजेसारख्या आधुनिक साउंड सिस्टीमची आवश्यकता नाही,' असे मत न्यायालयाने व्यक्त केले. ध्वनीप्रदूषण नियम २००० अंतर्गत 'शांतता क्षेत्र' म्हणून घोषित केलेल्या खेळाच्या मैदानावर  दांडीया, गरबा खेळला जात असल्याने तेथे साउंड सिस्टीमचा वापर करण्यास मनाई करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालय सुनावणी घेत होते. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने नवरात्रीच्या काळातील पुजेचे महत्त्व स्पष्ट केले.

'नऊ रात्री ज्याची पूजा केली जाते ते 'शक्ती'चे रूप आहे.   शक्तीदेवतेची उपासना तेव्हाच परिणामकारक ठरते जेव्हा ती एकाग्र मनाने कोणताही संकोच न बाळगता, आपल्या सभोवलताच्या वातावरणामुळे एकाग्रता भंग न होता व इतरांना कोणताही त्रास न देता करण्यात येते. त्यामुळे जर  देवीची पूजा गोंगाटात, इतरांना त्रास होईल, अशा पद्धतीने करण्यात येत असेल तर नवरात्रौत्सवाच्या देवतेची  मन एकाग्र ठेवून पूजा करता येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे,' असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

'या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेच आहे. पूर्ण एकाग्रता, शरीराची आणि मनाची सर्व शक्ती देवीकडे केंद्रीत केल्याशिवाय देवीची पूजा शक्य नाही. खरा भक्त आपली भक्ती व पूजा विचलित न होता व इतरांना त्रास न देता करू इच्छितो. त्यामुळे साहजिकच, खरा भक्त बाहेरील जगाकडून कोणताही व्यत्यय न येता भक्ती करू इच्छितो आणि तो त्याची भक्ती किंवा उपासना करताना अन्य कोणाला त्रास देत नाही. एखाद्या भक्ताने केलेल्या कोणत्याही उपासनेमुळे इतरांना त्रास होत असेल तर त्याच त्रासाची किंवा त्याहूनही अधिक त्रासदायक कृतीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. देवीची पूजा अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. भक्ताने त्याच्या किंवा तिच्या कृतीद्वारे उत्सवाची शिस्त आणि पावित्र्याचे बलिदान दिले जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही न्यायालयाने म्हटले.गरबा व दांडीया हे पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचा एक मार्ग आहे. हिंदू धर्मातील एका मोठ्या वर्गाने देवतेवरची भक्ती व्यक्त करण्याचा हा एक मार्ग मानला आहे, असेही निकालात नमूद केले आहे.

शांतता क्षेत्राबाबत सद्यस्थिती अशी आहे की येथे कोणतेही साउंड सिस्टीम वापरली जाऊ शकत नाही. पण याचा अर्थ सण साजरा केला जाऊ शकत नाही, असे नाही, असे म्हणत न्यायालयाने आयोजकांना संबंधित मैदानावर नवरात्रौत्सव साजरा करण्याची परवानगी दिली. मात्र, त्यावेळी डीजे, लाऊडस्पीकर व अन्य साउंड सिस्टीमचा वापर न करण्याचे निर्देश दिले. पारंपारिक व धार्मिक पद्धतीने सण साजरा करण्यास सांगितले. 

टॅग्स :नवरात्रीउच्च न्यायालय