कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखोंचा गंडा !
By Admin | Updated: January 29, 2015 02:06 IST2015-01-29T02:06:49+5:302015-01-29T02:06:49+5:30
कर्ज वाटप करणाऱ्या एका नामांकित बँकेची शाखा उघडून कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याची घटना चेंबूर येथे घडली आहे.

कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखोंचा गंडा !
चेंबूर : कर्ज वाटप करणाऱ्या एका नामांकित बँकेची शाखा उघडून कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याची घटना चेंबूर येथे घडली आहे. यामध्ये या शाखेच्या कर्मचाऱ्यांचा पगारदेखील बुडाल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबत गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महिन्याभरापूर्वीच चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात राज रेड्डी नावाच्या एका इसमाने गोल्ड क्राऊड नावाची एक शाखा सुरू केली. ही शाखा कर्ज वाटप करणाऱ्या एका नामांकित बँकेची असल्याचे तो सर्वांना सांगत होता. तसेच वैयक्तिक कर्ज वाटप करण्यासाठी त्याने काही वर्तमानपत्रांत जाहिरातदेखील दिली होती. त्यानुसार अनेकांनी या शाखेमध्ये येऊन वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केले होते. यासाठी या शाखेने अनेकांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लाखो रुपये जमा केले. मात्र कर्ज देण्यापूर्वीच या आरोपीने हे कार्यालय बंद करून पोबारा केला.
ही बाब कर्जदार आणि या शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या शाखेत काम करणारे ३० ते ३५ कर्मचारी महिन्याभरापूर्वीच या ठिकाणी रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांनी अनेक ग्राहकांकडून प्रोसेसिंग फीचे चेक आणि रोख रक्कम घेतली होती. त्यामुळे ज्या ग्राहकांनी या कर्मचाऱ्यांना पैसे दिले ते सध्या या कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी करू लागले आहेत. यामध्ये काही कर्मचाऱ्यांना धमक्यादेखील मिळत असल्याने कर्मचाऱ्यांनी आज गोवंडी पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
यामध्ये त्यांनी फसवणूक झालेली रक्कम ग्राहकांना परत मिळवून देण्याची मागणी केली असून आरोपीलादेखील तत्काळ अटक करण्याची विनंती यामध्ये केली आहे. फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी अनेक जणांनी चांगल्या नोकऱ्या सोडून या ठिकाणी नोकरी सुरू केली होती. मात्र महिन्याचा पगारही न मिळता अशी फसवणूक झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.(प्रतिनिधी)