मुंबई : राज्याच्या इतिहासात आज, २५ मार्च २०२० रोजी पहिल्यांदा सराफ बाजार कोरोनामुळे बंद राहिला. आणि या बंदमुळे राज्यातील सराफ बाजाराचे एका दिवसात ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोक सोन्याची खरेदी करण्यासाठी बाजारात येतात. साडेतीन मुहूर्तपैकी एक मुहूर्त म्हणून पाडव्याकडे पाहिले जाते. मात्र आज कोरोनामुळे सराफ बाजार पूर्णपणे ठप्प झाला आहे. यापूर्वी राज्यात सराफ बाजाराला रोज १० टक्के तोटा होत होता. आणि आता तर पाडव्याला म्हणजे आज ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. माझ्या माहितीनुसार शंभर वर्षात पहिल्यांदा असे घडले आहे. इतिहासात एवढा मोठा फटका सराफ बाजाराला बसला नव्हता. कोरोनामुळे सराफ बाजाराला ४०० कोटी रुपयांचा फटका दिवसाला बसला असून, हे इतिहासात पहिल्यांदा घडले आहे. मात्र आम्हाला या साऱ्यांचे दुःख नाही. कारण आम्हाला लोकांचे जीव महत्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉक डाऊन केले आहे; ही चांगली गोष्ट आहे. कारण ही बाब आमच्या साठी, आपल्यासाठी खूप महात्त्वाची आहे. आमचा मोदी यांना पाठिंबा आहे आणि लोकांनीसुद्धा या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकराने जे काही सांगितले आहे ते ऐकले पाहिजे. असे केले तर आपण या कोरोनाला सहज हरवू शकू, असेही कुमार जैन यांनी सांगितले.
Coronavirus: इतिहासात पहिल्यांदा सराफ बाजार बंद; ४०० कोटींचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 20:49 IST