Join us

'सोलापूरला टॉप 5' मध्ये पाहायचंय, सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 23:47 IST

सोलापूर जिल्ह्याला अध्यात्मिक वारसा आहे, जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या जिल्ह्याला सांस्कृतिक आणि कलेचाही मोठा वारसा आहे. हे सर्व असतानाही आपला जिल्हा अद्यापही मागे आहे

मुंबई - राज्यातील टॉप 5 शहरांमध्ये मी सोलापूरला बघतोय, त्यासाठी मी पुढाकार घेतला असून मला तुम्हा सर्वांच्या सोबतीची गरज आहे, असे सहकारमंत्री आणि सोलापूरचे सुपुत्र सुभाष देशमुख यांनी म्हटले. मुंबईतील पोलीस जिमखाना येथे आयोजित सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 'सोलापूर विकास आणि पर्यटन' या विषयावर सोलापूर जिल्ह्यातील मुंबईत कार्यरत असलेले पत्रकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज पत्रकार व अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याला अध्यात्मिक वारसा आहे, जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या जिल्ह्याला सांस्कृतिक आणि कलेचाही मोठा वारसा आहे. हे सर्व असतानाही आपला जिल्हा अद्यापही मागे आहे. जिल्ह्यातील तरुण मोठ्या संख्येने पुणे-मुंबईकडे येत आहेत. मात्र, आता आपल्याला सोलापूर शहरालाच मोठ्या उंचीवर न्यायचंय. त्यासाठी मूळ सोलापूरी असलेल्या आणि जगभरात विखुरलेल्या सोलापूरकरांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे सुभाष देशमुख यांनी म्हटले. तसेच ज्या मातीत आपण शिकलो, ज्या मातीतून आपण घडलो, त्या मातीचं देणं लागतो, ही भावना मनी जपत प्रत्येकाने सोलापूरच्या विकासकामात सहभागी व्हावे. सोलापूरला पहिल्या 5 शहरांत मला पाहायचेय. त्यासाठी तुम्ही हाक द्या, मी सर्वोतोपरी साथ देईल, अशा शब्दात सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूरकरांनी एकत्र यावे, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केली. 

याप्रसंगी मंत्रीमहोदयांनी सोलापूरकर पत्रकार आणि अधिकाऱ्यांच्या सूचनाही जाणून घेतल्या. तर उद्योग, कृषी, बाजारपेठ, फूड व्यवसाय यांसह विविध क्षेत्रातील विकासकामांबाबत चर्चाही केली. तसेच सोलापूरातील नागरिकांच्या मंत्रालयीन कामातील अडचणी सोडविण्यासाठी कक्ष सुरू करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी अनेकांनी आपल्या सूचना मांडताना सोलापूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन देशमुख यांचे खासगी स्वीय सहायक विजय पाटील यांनी केले होते, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार मंगेश चिवटे यांनी केले.

टॅग्स :सोलापूरसुभाष देशमुख