घरगुती पार्ट्यांवरही करडी नजर!
By Admin | Updated: December 21, 2015 01:26 IST2015-12-21T01:26:37+5:302015-12-21T01:26:37+5:30
नाताळ तसेच नववर्ष स्वागताकरिता विनापरवाना घरातल्या घरात दारू पिऊन मित्रमैत्रिणींसोबत धांगडधिंगा, हुल्लडबाजी करत असाल तर या वर्षी पोलीस तुमच्या घरात घुसून तुम्हाला अटक करतील

घरगुती पार्ट्यांवरही करडी नजर!
जितेंद्र कालेकर, ठाणे
नाताळ तसेच नववर्ष स्वागताकरिता विनापरवाना घरातल्या घरात दारू पिऊन मित्रमैत्रिणींसोबत धांगडधिंगा, हुल्लडबाजी करत असाल तर या वर्षी पोलीस तुमच्या घरात घुसून तुम्हाला अटक करतील. त्यामुळे नववर्षाची तुमची पहाट पोलीस कोठडीत होईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. येऊर व अन्य ठिकाणी रिसॉर्ट, हॉटेलांत विनापरवाना होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई करण्याचेही आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदा बाहेर किंवा घरातही दारू पिणे मुश्कील होणार आहे.
नाताळ किंवा नववर्ष स्वागतासाठी पार्टीचे आयोजन करायचे असल्यास त्यासाठी ‘वन डे’ परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिला जातो. एका पार्टीसाठी १३ हजार मोजून असा अधिकृत परवाना दिला जातो. तो मिळविला तर बिनधास्त ओली पार्टी करा. मात्र, परवाना नसेल तर पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला तयार राहा. अशी ‘पार्टी’ अगदी घरातही केली तरीही कारवाई केली जाणार आहे, असा स्पष्ट इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एन.एन. पाटील यांनी दिला आहे.
ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांमधील सर्वच ३४ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात डिसेंबर महिन्यात नाताळ व नवीन वर्षानिमित्त होणाऱ्या पार्ट्यांचा व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसमोरील आव्हानांचा आयुक्तांनी आढावा घेतला. या काळात येऊर, उपवन, कल्याणचे खाडीकिनारे, ढाबे आणि हॉटेल्समध्ये पार्ट्यांचे बेत आखले जातात. बऱ्याचदा केवळ पार्टीच्या नावाखाली टोळक्यांकडून धांगडधिंगा घातला जातो. कुठे हाणामारीचे प्रकार होतात. काही हॉटेल्समध्ये परवाना नसतानाही पार्ट्यांचे आयोजन होते. गेल्या काही वर्षांत रेव्ह पार्ट्यांचे पेव फुटले आहे. येत्या काही दिवसांत पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ढाबे, रिसॉर्ट तसेच हॉटेल्सवर छापा टाकणार आहेत. तेथे विनापरवाना पार्टी सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणार आहेत.
आठवड्यापूर्वी येऊरमध्ये एका राजकीय नेत्याच्या बंगल्यावर लग्नाची विनापरवाना पार्टी रंगली होती. पार्टी ऐन रंगात असतानाच वर्तकनगर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून डीजे बंद केला व सामग्री जप्त केली. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी येथेच एका हॉटेलच्या आवारात पार्टी सुरू असताना एकाने हवेत गोळीबार केला. या प्रकरणाचा तपास अद्याप प्रलंबित आहे. आता येऊरमध्ये विनापरवाना चालणाऱ्या सर्व हॉटेल्सवर कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्हा अधीक्षक एन.एन. पाटील यांनी दिली. या भागात आता केवळ चार हॉटेल्सना अधिकृत परवाना आहे. विनापरवाना पार्टी होत असलेल्या ठिकाणी टेहळणी करण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली आदी भागांतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १२ निरीक्षकांची पथके कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. येऊर, उपवनसह ठाण्यातील अनेक भागांत विशेष बंदोबस्त ठेवल्याची माहिती वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी दिली.