बनावट मद्यावर करडी नजर
By Admin | Updated: December 21, 2014 01:18 IST2014-12-21T01:18:20+5:302014-12-21T01:18:20+5:30
नाताळ, थर्टीफर्स्ट आणि थंडी यानिमित्ताने डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईसारख्या महानगरांमध्ये मद्याचे पाट वाहतात. लाखो लीटर दारू रिचवली जाते.

बनावट मद्यावर करडी नजर
थर्टीफर्स्टचे निमित्त : गोवा, दमण मार्गांवर उत्पादन शुल्क विभागाची गस्त वाढली
मुंबई : नाताळ, थर्टीफर्स्ट आणि थंडी यानिमित्ताने डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईसारख्या महानगरांमध्ये मद्याचे पाट वाहतात. लाखो लीटर दारू रिचवली जाते. हीच संधी साधून बनावट दारू विकणाऱ्या किंवा अन्य राज्यांमधून कर चुकवून स्वस्त दारूची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढतो. याही वर्षी अशा टोळ्या सक्रिय होण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार तयारी केली आहे.
उंची किंवा महागड्या दारूच्या बाटलीत स्वस्तातली किंवा भेसळयुक्त दारू भरून विक्री करणाऱ्या टोळ्या मुंबईसह राज्यात सर्वत्र सक्रिय आहेत. या टोळ्यांची मोडस आॅपरेंडी आणि ठिकाणे सहसा बदलत नाहीत. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने गेल्या काही वर्षांमध्ये पकडलेले आरोपी आणि ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच संबंधित ठिकाणांच्या अवतीभवती खबरे पेरून पुन्हा बनावट दारूचा अड्डा सुरू झाला का याची खातरजमा केली जाते आहे.
मुख्यत्वे गोवा आणि दमणमधून महाराष्ट्रात दारूची तस्करी होते. गोवा, दमणमध्ये उत्पादन शुल्क आणि कर कमी असल्याने तेथे तयार होणारी दारू स्वस्त आहे. राज्यात तीच दारू महाग आहे. किमतीत तफावत असल्याने तिथली दारू राज्यात चोरट्या मार्गाने आणून विकली जाते. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने मुंबईसह राज्यात दारूची मागणी वाढते. अशात गोवा, दमणची दारू इथे विकण्याचे प्रकारही वाढतात. त्यामुळे गोवा व दमणहून राज्यात येणाऱ्या मार्गांवर उत्पादन शुल्क विभागाने चौक्या उभारून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
खंबे फोडा; उत्पादन शुल्क विभागाच्या सूचना
१बनावट दारूला आळा घालण्यासाठी दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडा, अशी सूचना देणारे परिपत्रक गेल्या वर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढले. ते राज्यातील सर्वच परवानाधारक बारसह आणि जिथे कुठे अधिकृतरीत्या दारू मिळेल त्या सर्व आस्थापनांना लागू आहे.
२मुळात रिकाम्या बाटल्या सुस्थितीत मिळवून त्यात स्वस्तातली दारू भरून, पुन्हा सीलपॅक करून विकल्या जातात. जर बाटल्याच फोडल्या तर अशा टोळ्यांना आपोआपच चाप बसेल, हा त्यामागील उद्देश होता. या सूचनेची अंमलबजावणी होते का हे पडताळण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्या त्या ठिकाणी अचानक जाऊन माहिती घेतात.
३मात्र या परिपत्रकात कारवाईची तरतूद करण्यात आलेली नाही. बारमध्ये जितकी दारू विकली जाते त्याच प्रमाणात वाइन शॉपमधूनही दारू विकत घेणारे आहेत. त्यांच्यावर बाटली फोडली की नाही हे पडताळणारी यंत्रणा उभारणे कठीण असल्याचे उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी सांगतात.