मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येक वाहनांची पोलीस तपासणी करत असून आज सकाळी भाईंदर ते दहिसर चेक नाका क्रॉस करायला तब्बल दोन तास लागले. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. दरम्यान, कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार व प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी या सरकारच्या अनेक तुघलकी निर्णयाच्या परंपरेमधील पुढचा निर्णय असल्याची टीका त्यांनी केली आहे.
एकीकडे लॉकडाऊन संपला आहे, लोकांना संचाराला मुभा आहे, असे म्हणत असताना कुठलीही पूर्वसूचना न देता कालपासून लोकांना 2 किमी परिघ क्षेत्राच्या बाहेर जाताना पोलिसांनी काल प्रवाशांची अडवणूक केली. आज देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे स्वाभाविक सामाजिक अंतराच भानसुद्धा विसरलं गेलं आणि या सगळ्यातून लोकांच्या हालअपेष्टामध्ये अधिकच भर पडली. त्यामुळे हा तुघलकी निर्णय घेणारे कोण? याची चौकशी करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी आपल्या पत्रकाद्वारे केली आहे.