खिशाला चाट पाडणारे वर्ष

By Admin | Updated: December 30, 2014 00:48 IST2014-12-30T00:48:45+5:302014-12-30T00:48:45+5:30

निविदा घोटाळा, बेस्टची डबल भाडेवाढ, बेस्टसाठी मालमत्ता करावर अतिरिक्त भार असे गैरसोयीचे व मुंबईकरांच्या खिशाला चाट पाडणारेच हे वर्ष ठरले़

Lonely year | खिशाला चाट पाडणारे वर्ष

खिशाला चाट पाडणारे वर्ष

मुंबई : निवडणुकीच्या वर्षात मुंबईकरांना अनेक खुशीची गाजरे दाखविण्यात आली़ मात्र खोदलेले रस्ते, वाहतुकीची कोंडी, ई-निविदा घोटाळा, बेस्टची डबल भाडेवाढ, बेस्टसाठी मालमत्ता करावर अतिरिक्त भार असे गैरसोयीचे व मुंबईकरांच्या खिशाला चाट पाडणारेच हे वर्ष ठरले़
इमारत प्रस्ताव विभागातील घोटाळे उघड करणारे कॅम्पा कोला कंपाउंड आणि डॉकयार्ड इमारत दुर्घटनेचे सावट या वर्षावरही कायम राहिले़ मात्र दोन्ही प्रकरणांतून अद्याप पालिकेची सुटका झालेली नाही़ याउलट महापालिकेतील आणखी नवे घोटाळे उजेडात आले आहेत. यापैकीच एक ई-निविदा घोटाळ्याने तर अभियंता आणि ठेकेदारांमधील धक्कादायक साटेलोटे समोर आले आहे़
मात्र, दक्षता खाते आणि उपायुक्तांनी चौकशी अहवाल दिल्यानंतरही आणखी एक चौकशी समिती स्थापन करून प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे़ त्यामुळे सुमार दर्जाचे काम मुंबईकरांच्या माथी मारणारे मोकाटच आहेत़ वर्ष सरता-सरता बेस्टकडून फेब्रुवारी आणि एप्रिल अशी डबल भाडेवाढीची भेट मुंबईकरांना मिळाली आहे़

अग्निशमन दलाचे वाभाडे
अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे जवानच अडकले होते़ यात एका जवानाचा होरपळून मृत्यू झाला़ अग्निशमन दलाकडे असलेल्या तुटपुंज्या व कुचकामी साहित्यांमुळेच जवानाचा बळी गेल्याचे आरोप झाले़ या प्रकरणी अग्निशमन दलाचे तत्कालीन प्रमुख एन. वर्मा यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली़

सफाई अभियान
या वर्षी पालिकेने हाती घेतलेले एकमेव काम आतापर्यंत इमानेइतबारे सुरू आहे ते म्हणजे सफाई अभियाऩ दर शुक्रवारी आणि शनिवारी कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने विभागस्तरावर पालिका कार्यालय व परिसरांची सफाई सुरू आहे़

निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेचे फिस्कटल्यामुळे महापालिकेतील २१ वर्षांची युतीची सत्ता धोक्यात आली होती़ यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे होती़ मात्र वर्ष अखेरीस सत्तेसाठी उभय पक्षांनी सूत जुळवले आणि महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकत राहिला़

१९९५ पर्यंतची पाणीपुरवठ्याची डेडलाइन वाढवून २००० पर्यंत करण्यात आली होती़ मात्र बेकायदा झोपड्यांमधून पाणी चोरण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे करदात्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते़ याची दखल घेऊन उच्च न्यायालयानेच फटकारल्यानंतर सरसकट सर्वच झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे़

पालिकेने आर्थिक मदत करण्यास नकार दिल्यामुळे निवडणुकीच्या काळात लांबणीवर टाकलेली भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव बेस्टने आणला़ ही भाडेवाढ स्थायी समितीनेही मंजूर केली आहे़ त्यानुसार फेब्रुवारी आणि एप्रिल अशा दोन महिन्यांत किमान दोन रुपयांची भाडेवाढ होणार आहे़ त्याचबरोबर आता मालमत्ता करामधून बेस्टची तूट वसूल करण्यासाठी जादा कर आकारण्याची परवानगीही बेस्टने मागितली आहे़

Web Title: Lonely year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.