तलावांच्या शहरात ‘तलाव’च एकाकी!

By Admin | Updated: April 18, 2015 23:03 IST2015-04-18T23:03:51+5:302015-04-18T23:03:51+5:30

ऐतिहासिक पनवेल शहराला तलावांचा वारसा लाभलेला आहे. एक नाही तर तब्बल पाच तलावांचे शहर असल्यामुळे पाच तळ्यांचे शहर म्हणून पनवेल प्रसिद्ध होते,

Loneliness alone in the lake! | तलावांच्या शहरात ‘तलाव’च एकाकी!

तलावांच्या शहरात ‘तलाव’च एकाकी!

वैभव गायकर - पनवेल
ऐतिहासिक पनवेल शहराला तलावांचा वारसा लाभलेला आहे. एक नाही तर तब्बल पाच तलावांचे शहर असल्यामुळे पाच तळ्यांचे शहर म्हणून पनवेल प्रसिद्ध होते, मात्र तलावांच्या शहरात सध्या तलावच एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. तलावांबाहेर अतिक्रमण, खाद्यपदार्थांची दुकाने, तसेच या तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे या तलावांचा श्वास गुदमरत असून तलावांच्या स्वच्छतेबाबत नगरपरिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पनवेलमध्ये कृष्णाळे, वडाळे, इस्रायली (विश्राळे), लेंडाळे, देवाळे हे पाच तलाव आहेत. या पाच तलावांपैकी लेंडाळे तलाव वगळता चारही तलावांची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. कृष्णाळे तलावाच्या चारही बाजूंनी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून खाद्यपदार्थांच्या पिशव्या याच पाण्यात विक्रेते टाकत आहेत. कृष्णाळे तलाव हा शहरातील सर्वात मोठ्या तलावांपैकी एक तलाव होता. या तलावाची हद्द हळूहळू बुजवून याठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स, नाट्यगृहासारख्या वास्तूही उभारल्या. वडाळे तलावाची अवस्थाही बिकट झाली आहे. या ठिकाणच्या परिसरातील सांडपाणी थेट तळ्यात सोडल्याने तलावाचे पाणीच दूषित होत चालले आहे.
या तळ्याची साफसफाई करण्यासाठी नगरपरिषद कोणतीही तसदी घेत नसून महिला सदस्य स्वखर्चाने दरवर्षी हजारो टन गाळ या ठिकाणाहून बाहेर काढतात. नगरपरिषदेच्या समोरच असलेल्या देवाळे तलावाचीही हीच अवस्था झालेली आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांनी हा तलाव नेहमीच भरलेला असतो. शहरामध्ये इस्रायली नागरिकांची वस्ती असलेल्या इस्रायली (विश्राळे) तलावाजवळ झोपड्यांचे अतिक्रमण सध्या वाढत चालले आहे; तसेच अनेक महिलावर्गही या तलावाचा कपडे धुण्यासाठी वापर करतात.
शहराला लाभलेला तलावांचा वारसा जपण्यासाठी नगरपरिषदेकडे कोणतीच यंत्रणा नसल्याने या तलावांचा श्वास गुदमरत चालला आहे. लेंडाळे तलावाची अवस्था काही प्रमाणात व्यवस्थित आहे. त्यासाठी नगरसेवक लतिफ शेख यांनी पुढाकार घेतला. या तलावाच्या भोवताली लोखंडी रेलिंग, बाजूला जॉगिंग ट्रॅक आदी उभारून त्यांनी इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श निर्माण केला आहे. नगरपरिषदेमधील एक नगरसेवक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर नगरपरिषदेमार्फत तलावांचे सुशोभिकरण करत असेल तर इतर लोकप्रतिनिधीही ते करू शकतात. शहरात नैसर्गिकरीत्या पाच तलाव असूनही या तलावातील पाण्याचा वापर पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी केला जात नाही, हेच येथील दुर्दैव म्हणावे लागेल.

नगरपरिषद तलावांच्या स्वच्छतेबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. सांडपाणी थेट तलावात जाऊ नये यासाठी देखील आम्ही शहरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे काम सुरू केले आहे. तसेच कृष्णाळे व देवाळे या तलावांच्या स्वच्छतेसाठी व सुशोभिकरणासाठी आम्ही निविदाही काढलेली आहे. लवकरच पनवेलमधील तलाव सुशोभित केली जातील .
- मंगेश चितळे,
मुख्याधिकारी, पनवेल.

Web Title: Loneliness alone in the lake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.