'मे आय हेल्प यू'ची खिडकी रिकामी; कुर्ला, टिळकनगर, मानखुर्द स्टेशनमध्ये कसली रुग्णवाहिका आणि कसलं काय?
By सचिन लुंगसे | Updated: October 27, 2025 12:30 IST2025-10-27T12:29:24+5:302025-10-27T12:30:24+5:30
बहुंताश रेल्वे स्टेशनवर कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसल्याचे 'लोकमत'च्या 'रिअॅलिटी चेक'मध्ये दिसून आले.

'मे आय हेल्प यू'ची खिडकी रिकामी; कुर्ला, टिळकनगर, मानखुर्द स्टेशनमध्ये कसली रुग्णवाहिका आणि कसलं काय?
सचिन लुंगसे
पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर आपत्कालीन स्थितीत महिलेची प्रसूती झाली. स्टेशनवर कोणतीही सुविधा मिळाली नाही. रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे विकास बेद्रे या तरुणाने त्याची डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख यांना व्हिडीओ कॉल करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रसूती करण्यास मदत केली. मात्र या घटनेने रेल्वेकडे स्टेशनबाहेर रुग्णवाहिका नसणे यासह कोणत्याही इमर्जन्सी वैद्यकीय सुविधा नसल्याचे वास्तव पुन्हा उघड झाले. रोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. मात्र अपघात झाल्यास किंवा आणीबाणीचा प्रसंग ओढावल्यास मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महानगरातही बहुंताश रेल्वे स्टेशनवर कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसल्याचे 'लोकमत'च्या 'रिअॅलिटी चेक'मध्ये दिसून आले. त्याचाच मांडलेला हा लेखाजोखा...
मुंबईकर जिवावर उदार होत लोकलमधून प्रवास करतात. गर्दीच्या वेळेला अपघाताच्या घटना घडतात. रेल्वे स्टेशनवरही कित्येक वेळा आपत्कालीन प्रसंग घडतात. अशावेळी रेल्वे स्टेशनवर नेमकी कोणाची मदत घ्यायची? आणि मदत मागितली तर ती वेळेवर मिळेल की नाही, याची शाश्वती नसते. 'मे आय हेल्प यू', असा बोर्ड खिडकीवर असतो. पण तेथे कोणी बसलेले कधी दिसत नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
कुर्ला, टिळक नगर, चेंबूर, गोवंडी व मानखुर्द परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून रुग्णवाहिका उभी असलेली कधी दिसलीच नाही, असे प्रवासी सांगतात. 'लोकमत'ने या स्टेशनचा 'रिअॅलिटी चेक' केला असता सुविधांचा अभाव जाणवला. कुर्ला स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला गेल्या कित्येक वर्षात कधीच रुग्णवाहिका निदर्शनास आलेली नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूचा परिसर फेरीवाल्यांनी व्यापला असून, आपत्कालीन प्रसंगात मदत लागली, तर पोलिसांना आवाज देण्याशिवाय प्रवाशांना दुसरा कोणताच पर्याय येथे नाही.
दुखापत होण्याची भीती
कुर्ला स्टेशनपर्यंत रुग्णवाहिका पोहोचावी, यासाठी रस्तेही मोकळे हवेत. अनधिकृत फेरीवाल्यांनी स्टेशन परिसर व्यापलेला असतो. स्टेशनवर कायम काही ना काही कामे सुरू असतात. या कामादरम्याच कुणाला दुखापत होईल, याची सतत भीती वाटते, असे प्रवासी राकेश पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले.
रेल्वे स्थानकांच्या आसपास रुग्णवाहिका असावी किंवा स्टेशनवर मदत लागली, तर रुग्णवाहिकेला बोलवता येईल, हेच स्थानिकांना माहिती नाही. टिळक नगर आणि चेंबूर ही दोन मोठी स्टेशन आहेत. गेल्या कित्येक वर्षांत स्टेशनच्या परिसरात कधी रुग्णवाहिका उभी असल्याचे दिसले नाही. मे आय हेल्प यू, असा एक बोर्ड खिडकीवर लागलेला असतो. पण, त्या खिडकीपलीकडे कोणी बसलेले कधी दिसत नाही- सुभाष मराठे निमगावकर, चेंबूर
गोवंडी, मानखुर्द रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. गेल्या कित्येक वर्षात या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या आसपास रुग्णवाहिका उभी असलेली दिसली नाही. रात्री या दोन्ही रेल्वे स्थानकांवर पुरेसे पोलिस असणे गरजेचे आहे. मात्र नेहमीची सुरक्षा सोडली, तर फार वेगळे चित्र नसते. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी स्टेशनवर पोलिस सोडले तर कोणाची मदत मागायची? याचे उत्तर कोणाकडे नाही - फय्याज आलम शेख, गोवंडी