Join us  

LMOTY 2018 : 'प्रॉमिसिंग' पूनम महाजन ठरल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 9:33 PM

मुंबई - केवळ वारसाहक्काने आपल्याकडे आलेली राजकीय गादी सांभाळण्यात धन्यता न मानता राजकारणाच्या पटलावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पूनम महाजन यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले.

मुंबई - केवळ वारसाहक्काने आपल्याकडे आलेली राजकीय गादी सांभाळण्यात धन्यता न मानता राजकारणाच्या पटलावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पूनम महाजन यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूनम महाजन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात पूनम महाजन यांना मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

 

भाजपाच्या युवा फळीतील प्रभावी राजकारणी

उत्तर-मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार असणाऱ्या पूनम महाजन यांनी तरुण आणि नवीन मतदारांना पक्षाकडे वळविण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली. यामुळेच २०१० मध्ये त्यांची भारतीय युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, तर डिसेंबर २०१६ मध्ये त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रेसिडेंट म्हणून निवड झाली होती. याशिवाय त्याच वेळी त्या भारतीय बास्केटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली होती. या फेडरेशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता. सध्या त्या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. संसद सदस्य म्हणून निवडून आल्यावर पूनम यांनी केंद्रीय नागरी विकास समितीवर काम केले. सध्या त्या वित्त मंत्रालयाच्या सल्लागार समितीवरही कार्यरत आहेत. भाजपासाठी अगदीच प्रतिकूल म्हणावा, अशा उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करत पूनम महाजन यांनी दिल्ली गाठली. 'जाएंट किलर' पूनम महाजन आज भाजपाचा युवा चेहरा म्हणून राष्ट्रीय राजकारणात वावरत आहेत. भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून देशभर युवांचे संघटन करत आहेत, त्यांचे प्रश्न मांडत आहेत. याशिवाय, मुंबईतील पायाभूत विकासकामे मार्गी लावण्यात पूनम महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मुंबईत आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. महिला, युवक आणि लहान मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘ग्लोबल सिटिझन फोरम’चा कार्यक्रम त्यांनी मुंबईत घडवून आणला. पूनम महाजन यांच्या प्रयत्नांमुळेच ग्लोबल सिटिझन पहिल्यांदाच भारतात, त्यातही मुंबईत दाखल झाला होता. २२ डिसेंबर २०१६ साली औपचारिकपणे भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. उमा भारती यांच्यानंतर या पदावर येणाऱ्या त्या एकमेव महिला कार्यकर्त्या आहेत. विशेष म्हणजे कधी काळी प्रमोद महाजन यांनीही ही धुरा वाहिली होती. राजनाथ सिंग, शिवराजसिंग चौहान आदी दिग्गज नेत्यांनीसुद्धा भाजयुमोचे अध्यक्षपद सांभाळले होते. मेहनत आणि पक्षाशी अविचल निष्ठेच्या जोरावर दिग्गज नेत्यांच्या मांदियाळीत पूनम महाजन आता सामील झाल्या आहेत. 

टॅग्स :पूनम महाजनलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८लोकमत इव्हेंट