लोकमत आंतरकार्यालयीन करंडक क्रिकेट स्पर्धा
By Admin | Updated: January 9, 2015 22:49 IST2015-01-09T22:49:25+5:302015-01-09T22:49:25+5:30
वाशी येथील मैदानात लोकमत आयोजित ‘आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धा २०१५’ शुक्रवारी रंगली. स्पर्धेत लोकमत कार्यालयातील एकूण सहा संघांनी सहभाग घेतला.

लोकमत आंतरकार्यालयीन करंडक क्रिकेट स्पर्धा
नवी मुंबई : वाशी येथील मैदानात लोकमत आयोजित ‘आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धा २०१५’ शुक्रवारी रंगली.
स्पर्धेत लोकमत कार्यालयातील एकूण सहा संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत चिंचपोकळी संघ विजेता ठरला, तर उपविजेतेपद वरळी संघाला मिळाले.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लोकमततर्फे खास क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लोकमतच्या सहा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये वरळीचे २ संघ, ठाणे १ , चिंचपोकळी १ , सानपाडा १ , महापे १ आदींचा समावेश होता. अंतिम सामन्यात चिंचपोकळी विरुद्ध वरळी संघाची लढत रंगली. या लढतीत चिंचपोकळी संघाने प्रतिस्पर्धी वरळी संघाला पाच षटकांमध्ये ६१ धावांचे आव्हान दिले होते.
मात्र वरळी संघाला ३२ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात उत्कृष्ट फलंदाज व सामनावीर म्हणून समित राऊत यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे यांच्याहस्ते विजयी संघाला चषक देण्यात आला. विजयी संंघाचे कर्णधार लोकमत समूहाचे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी विजयी करंडक स्वीकारला.
लोकमत मुंबईचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर हे देखील बक्षीस वितरण समारंभावेळी उपस्थित होते. या सामन्यांच्या आयोजनामध्ये पनवेल लोकमतचे शाखा
प्रमुख सागर गावंडे यांचा मोठा सहभाग होता. या स्पर्धेसाठी काँग्रेसचे नगरसेवक दशरथ भगत, निशांत भगत यांनी विशेष सहकार्य केले.
(प्रतिनिधी)