Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील प्रतिभावंतांचा ‘लोकमत’ने केला गौरव; राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 05:56 IST

अभिनेता आमीर खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ठरले विशेष आकर्षण 

मुंबई : अथांग समुद्राच्या लाटांची गाज आणि अपार उत्साहात गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने मंगळवारी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. ख्यातनाम अभिनेते आमीर खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत हे या रंगतदार सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. 

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, तसेच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, केदार शिंदे, बॉलिवूड पार्श्वगायक शान, लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्यासह प्रशासन, उद्योग, शिक्षण, समाजकारण, चित्रपट, कला-क्रीडा आणि वैद्यकीय आदी क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा अविस्मरणीय झाला. 

या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रसिद्ध अभिनेते विकी कौशल यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात अलौकीक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. 

या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते आमीर खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत लक्षवेघी ठरली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी आमीर यांच्या प्रश्नांना सखोल उत्तरे देत राज्याच्या विकासाचा रोडमॅप मांडला. गेट वे ऑफ इंडियावरील ही संध्याकाळ या मुलाखतीने रंगली. आमिर खान यांनी आपल्या नेहमीच्या सहज आणि संवादकुशल शैलीत प्रश्नांची सरबत्ती केली, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तेवढ्याच स्पष्ट, थेट आणि हलक्याफुलक्या शैलीत उत्तरे देत वातावरणात उत्साह निर्माण केला. कधी राजकारणातील आदर्शवादावर गंभीर चर्चा रंगली, तर कधी चित्रपटांतील व्यक्तिरेखांच्या उदाहरणांतून हलकेफुलके क्षणही निर्माण झाले. महाराष्ट्राचा विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, युवकांचे मानसिक आरोग्य, सोशल मीडियाचा प्रभाव आणि क्रीडेला शिक्षणात असलेले महत्त्व अशा विविध विषयांवर दोघांमध्ये मुक्त संवाद झाला. चित्रपटांतील व्यक्तिरेखांच्या उदाहरणांवर आधारित प्रश्नोत्तरांच्या भागाने तर कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. 

पुरस्कार विजेत्यांची यादी

जीवनगौरव पुरस्कार : अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेतेआऊटस्टँडिंग पॉलिटिशियन : चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य)सर्वाेत्कृष्ट अभिनेता : विकी कौशल बिझनेस : एम.पी. अहमद (चेअरमन, मलाबार ग्रुप)फ्रिलॉन्थ्रॉफिस्ट : सीए. अभय भुतडा, संस्थापक, टॅब व अभय भुतडा फाऊंडेशनलोकसेवा समाजसेवा : मतीन भोसले, अमरावती राजकारण इन्फ्लुएन्शियल : प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री, शिंदेसेना, कोल्हापूर राजकारण प्रॉमिसिंग : आ. अमित साटम, मुंबई अध्यक्ष, भाजप मुंबई आयपीएस प्रॉमिसिंग : निलोत्पल, एस. पी. गडचिरोली आयएएस प्रॉमिसिंग : डॉ. मिताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार उद्योग : नरेंद्र गोलिया, कार्यकारी अध्यक्ष, ऋषभ इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेड, नाशिकस्टार्टअप : भरत गीते, संस्थापक व सीईओ, तौरल इंडिया प्रा. लि., पुणेशिक्षक : उमेश खोसे, जिल्हा परिषद शाळा, गुंजोटीवाडी, जि. धाराशिव वैद्यकीय - मुंबई  : डॉ. गौतम भन्साली, संसर्गजन्य आजार तज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल वैद्यकीय - शासकीय  : डॉ. आरती किणीकर, बालरोग चिकित्सा शास्त्र तज्ञ, ससून हॉस्पिटल, पुणे वैद्यकीय उर्वरित महाराष्ट्र : डॉ. ज्ञानदेव चोपडे, जेनेटिक्स तज्ञ, जेनेरिक हेल्थ अँड रिसर्च सेंटर, नाशिक कृषी : विशाल अग्रवाल, अटवाडा, तालुका रावेर, जळगाव क्रीडा : सर्वेश कुशारे, अथलेटिक्स, नाशिक 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat Honors Maharashtra's Talents; Star-Studded Ceremony Celebrates Achievements.

Web Summary : Lokmat's 'Maharashtrian of the Year' awards honored achievers across fields. A highlight was Aamir Khan's interview with CM Fadnavis. Ashok Saraf received a Lifetime Achievement Award, and Vicky Kaushal was also honored. The event celebrated excellence in diverse sectors like business, social service, and sports.
टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026मुंबई