लोकमत उपमहापौरांचा वॉर्ड रिपोर्ट : रस्ते खोदले, मलब्याचे ढीग... रोज धुळीशी सामना
By मनोहर कुंभेजकर | Updated: March 10, 2026 13:22 IST2026-03-10T13:21:47+5:302026-03-10T13:22:18+5:30
पश्चिम उपनगरचे शेवटचे टोक म्हणजे दहिसर. मुंबईचे उपमहापौर संजय घाडी हे शिवसेनेचे दहिसरचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक आहेत.

लोकमत उपमहापौरांचा वॉर्ड रिपोर्ट : रस्ते खोदले, मलब्याचे ढीग... रोज धुळीशी सामना
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम उपनगरचे शेवटचे टोक म्हणजे दहिसर. मुंबईचे उपमहापौर संजय घाडी हे शिवसेनेचे दहिसरचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक आहेत. पश्चिम उपनगरातील मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील हा विकसनशील भाग आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत प्रभागातील स्थिती चांगली असली तरी जागोजागी खोदून ठेवलेले रस्ते, नॅन्सी बस डेपो आणि तोलेजंग इमारतींच्या बांधकामामुळे होणारे हवेचे प्रदूषण आणि पार्किंगच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
बोरीवली, दहिसर रेल्वे स्टेशन तसेच अंधेरी पूर्व, गुंदवली ते अंधेरी पश्चिम डीएन नगरपर्यंत जाणारी मेट्रो, जोडला बेस्टच्या वातानुकूलित बसेस यामुळे सुलभ प्रवासाची सोय झाल्याने प्रभागाचा चेहरामोहरा बदलला असला तरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी काही कमी झालेली नाही.
प्रभागाचा लेखाजोखा
सोसायट्या / इमारती: ५५%
झोपडपट्टी लोकसंख्या: ४५%
प्रभाग क्रमांक : ५ (अशोकवन-शिव वल्लभ रोड)
प्रभागाची लोकसंख्या (अंदाजे) : ४६,०००
विधानसभा मतदारसंघ : १५४ मागाठाणे
लोकसभा मतदारसंघ : उत्तर मुंबई
भौगोलिक क्षेत्र व सुविधा
प्रमुख रस्ते : शिव वल्लभ रोड, संत ज्ञानेश्वर मार्ग
प्रमुख चौक : हनुमान मंदिर, शिवाजी चौक
बाजारपेठा : रावळपाडा मार्केट, अशोकवन मार्केट
शैक्षणिक संस्था : अशोकवन महापालिका शाळा, युनिव्हर्सल स्कूल, विद्याभूषण
उद्याने : आजी आजोबा, युनिव्हर्सल, अलकनंदा, अशोकवन
महत्त्वाचे चालू व प्रस्तावित प्रकल्प : रस्ते, मलनिस्सारण वाहिनी, ड्रेनेज, जलवाहिन्या, उद्यान विकास
प्रभागात कोणकोणत्या आहेत प्रमुख समस्या?
वाहतूककोंडी : पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोकुळ आनंद हॉटेलसमोर रोजचीच वाहतूककोंडी असते. त्यामुळे नागरिकांना बोरिवली रेल्वेस्टेशनवर पोहोचायला वेळ लागतो.
पार्किंग : पार्किंगची समस्या सगळीकडे असून, वाहनचालक रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
रस्त्यांची अवस्था : मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असल्याने प्रभागात रस्ते खोदून ठेवलेले आहेत. यामुळे रस्त्यांवर मातीचे ढीग साचले आहेत.
अतिक्रमण : फेरीवाल्यांची समस्या असून पालिकेने कारवाई केल्यावर परत फेरीवाले रस्त्यावर दुकान लावतात. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर नीट चालता येत नाही.
आरोग्य व्यवस्था : पालिकेचे रावळपाडा प्रसूतिगृह, तसेच सद्गुरू हॉस्पिटल, अशोक वन हॉस्पिटल, माउली हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, प्रेरणा हॉस्पिटल आदी खासगी हॉस्पिटल आहेत. मात्र, नव्या स्वरूपातील पालिकेची भगवती हॉस्पिटल कधी सुरू होते, याची लोक वाट बघत आहेत.
नॅन्सी कॉलनी एसटी बस आगारातून प्रचंड वायू प्रदूषण
१. प्रभागातील नॅन्सी कॉलनीमध्ये राज्य परिवहन मंडळाचे एसटी बस आगार आहे. या आगाराची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रोज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागांतून येणाऱ्या तसेच मुंबई-स्वारगेट वातानुकूलित शिवनेरी बसेस येथून ये-जा करतात.
२. आगाराचा तळ मातीचा असल्याने बसेस मातीतच उभ्या असतात. पहाटे ४ ते मध्यरात्रीपर्यंत १८५ बसेस येताना व जाताना प्रचंड धूळ उडवून वायू प्रदूषण करतात. त्यामुळे स्थानिक, प्रवासी, चालक-वाहक, आगार कर्मचारी सारेच बेजार आहेत.
स्थानिक काय म्हणतात?
"नॅन्सी बस आगाराचे संपूर्ण सिमेंटीकरण करून सोयीसुविधांनी युक्त बस डेपो करावा. प्रवासी शौचालयाची खूपच दुरवस्था झाली आहे. साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नाही."
— सचिन पाटील, स्थानिक प्रवासी
"हनुमान टेकडी, काजूपाडा भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाण्याचा दाब वाढवून आमच्या भागातील पाणीटंचाई दूर करावी."
— फुलाबाई गांगुर्डे, स्थानिक रहिवासी
प्रशासनाची बाजू
"मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असल्याने रस्ते खोदले आहेत. येत्या मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण झाल्यावर वाहतूककोंडी दूर होईल. पार्किंग समस्येबद्दल वाहतूक पोलिसांशी बोलून मार्ग काढू. हनुमान टेकडीचा पाणी प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. तेथे जास्त हॉर्स पॉवरचा पंप बसवला असून, टाकीची क्षमता वाढविली आहे. नॅन्सी डेपोबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहे."
संजय घाडी, उपमहपौर व नगरसेवक
"नॅन्सी डेपोतील प्रदूषणाबाबत ठाणे वाहतूक आगार व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार झाला आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नाही. अशोकवन व इतर भागांतील फेरीवाल्यांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर पालिका प्रशासनाकडून नियमित कारवाई केली जाते. या प्रभागाचा सुमारे ९० टक्के विकास पूर्ण झाला असून, उर्वरित विकासकामे प्रगतिपथावर आहेत."
नयनीश वेंगुलेंकर, सहायक आयुक्त, आर उत्तर विभाग
प्रभागाचे प्रगती पुस्तक
रस्ते : ★★★ (३/५)
स्वच्छता : ★★★★ (४/5)
प्रदूषण : ★★ (२/५)
आरोग्य : ★★★★ (४/५)
पार्किंग : ★ (१/५)
(५ स्टार - अतिशय चांगले, ४ - चांगले, ३ - ठीकठाक, २ - वाईट, १ - अत्यंत वाईट)