Join us  

भाजपाविरोधात 'उलटे कमळ', रासप कार्यकर्त्याची मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 2:02 PM

23 मार्चला रासपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असून त्यानंतरच रासपची भूमिका ठरणार असल्याचे रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.

मुंबई - शिवसेना-भाजपाची युती जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र युतीच्या घटक पक्षांबाबत अद्याप दोन्ही पक्षाकडून ठोस भूमिका न घेतल्याने महादेव जानकर हे नाराज आहेत. त्यामुळे जानकरांकडून विविध चाचपणी सध्या सुरु आहे. 

महादेव जानकर यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे मात्र भाजपाकडून अद्यापही जानकारांना ग्रीन सिग्नल मिळाला नाही. जानकरांना लोकसभा लढवायची असेल तर त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असं मुख्यमंत्र्यांनी जानकरांना सांगितले पण महादेव जानकर कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यात फारसे इच्छुक नाही. त्यांना स्वत:च्या रासप पक्षाच्या कपबशी चिन्हावर निवडणूक लढवायची आहे त्यामुळे जानकरांना भाजपा तिकीट देणार का असा प्रश्नचिन्ह रासपच्या कार्यकर्त्यांसमोर आहे. 

2014 मध्ये महादेव जानकर यांचा वापर भारतीय जनता पार्टीने केला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडून दिले अशी भावना रासपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे रासप कार्यकर्त्यांनी भाजपाविरोधात सोशल मिडीयात उलटे कमळची मोहीम आखली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून फेसबुक आणि व्हॉट्सअपवर उलटे कमळ फोटो लावण्यात आलेले आहेत. 

राष्ट्रीय समाज पक्ष हा राज्यातील सत्तेत सहभागी आहे. लोकसभा निवडणुकीत रासपाने भाजपकडे दोन जागांची मागणी केली आहे. यासाठी महादेव जानकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत पण त्यातून निष्फळ काही होत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेत. पण भाजप लवकरच रासपची मागणी पूर्ण करेल, तेव्हा रासपच्या कार्यकर्त्यांनी सयंम बाळगावा. 23 मार्चला रासपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असून त्यानंतरच रासपची भूमिका ठरणार असल्याचे रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. याचसोबत सोशल मीडिया मध्ये रासपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ उलटे लावले आहेत. २३ तारखेपर्यंत रासपच्या कार्यकर्त्यांनी धीर धरण्याचे आवाहन दोडतले यांनी केले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी महादेव जानकर यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी शिवसेना-भाजपला जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्या अन्यथा आम्हाला चौथी आघाडी करावी लागेल असा इशारा दिला होता. त्यामुळे उद्या महादेव जानकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूकमहादेव जानकरदेवेंद्र फडणवीसभाजपा