Join us  

मतदानाला जाताना तुमचा मोबाइल घरीच ठेवा! फोन सापडल्यास गुन्हा नोंदवणार, सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 11:15 AM

निवडणूक प्रक्रियेत बाधा येण्याची भीती.

मुंबई : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. मतदानासाठी मतदान केंद्रांवर जाताना काही गोष्टींची काळजी मतदारांनी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर मोबाइल फोन घेऊन जाण्यास मनाई आहे. फोन नेल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.    मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होताना काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामध्ये मतदान केंद्रात मोबाइल फोन घेऊन जाण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.  केंद्रावर गाणी वाजवून अथवा संवेदनशील प्रक्रियेचे चित्रण करून मतदानप्रक्रियेत व्यत्यय आणण्याचा धोका आहे. 

१) मोबाइल फोनचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे.

२) मतदान केंद्रात प्रवेश करताना केंद्रावरील पोलिस कर्मचाऱ्याकडून तपासणी करूनच मतदारांना आतमध्ये सोडले जाते. 

३) अशावेळी मोबाइल फोन सापडल्यास मतदाराला मतदान केंद्रात जाण्यास मनाई केली जाते. 

४) तसेच मोबाइल फोन केंद्राबाहेर ठेऊन आल्यावरच आतमध्ये प्रवेश दिला जातो. 

५) काही केंद्रांबाहेर मोबाइल ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे. मात्र या ठिकाणी मोबाइल चोरीला जाण्याचा किंवा अदलाबदल होण्याचा धोका असतो. 

मतदान केंद्रात कडक तपासणी करूनच सोडले जाते. मतदान केंद्रावर येताना नागरिकांनी मोबाइल आणू नये. मात्र एखादा व्यक्ती बळजबरीने मोबाइल फोन घेऊन गेल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच मोबाइल फोन जप्त केला जाईल.- विकास पानसरे, निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ

... यामुळेच मनाई आदेश

मतदान ही गोपनीय बाब आहे. मात्र, मतदान केंद्रात मतदान करतानाचा फोटो काढून तो समाजमाध्यमावर प्रसारित केला जाण्याचा धोका असतो. त्यातून ऐन मतदानावेळी मतदारांना प्रभावित केले जाऊ शकते. 

मतदान केंद्रावरील गोपनीय माहितीचेही फोटो काढून प्रक्रियेत व्यत्यय आणला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रात फोटो काढण्यास मनाई आहे. 

परिणामी मतदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यापार्श्वभूमीवर मतदानासाठी येताना मोबाइल घरीच ठेऊन यावा, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांना केले आहे. 

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मोबाइल