Join us  

खर्च करा जोमानं, हिशेबही द्या दमानं; निवडणूक आयोगाच्या प्रमुख उमेदवारांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 10:43 AM

मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराला प्रचारासह विविध खर्चांसाठी ७५ लाख रुपये खर्चाची मर्यादा होती.

मुंबई :मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत २० मे रोजी निवडणूक होत असून, त्याकरिता महायुती आणि महाविकास आघाडी, तसेच अपक्ष उमेदवारांनी रविवारी सुटीचा दिवस साधून प्रचाराचा धडाका लावल्याचे पाहायला मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराला प्रचारासह विविध खर्चांसाठी ७५ लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही मर्यादा २० लाख रुपयांनी वाढवून ९५ लाख रुपये करण्यात आली आहे. 

उमेदवारांना त्यांनी केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

१) सत्ताधारी आणि विरोधक पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला आता जोर आला आहे. रोज उमेदवार सकाळपासून रात्रीपर्यंत आपला मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

२) उमेदवारांबरोबर त्यांचे कार्यकर्ते, नेते त्यांच्या बरोबर फिरत असतात. त्यासाठी ते वाहने वापरत असतात.

३) त्यासाठी संबंधित परवानगी निवडणूक विभागाकडून घेतली जाते. या प्रचार वाहनांवर निवडणूक आयोगाची करडी  नजर असते.

... यावर होतोय खर्च

निवडणूक म्हटली की, प्रचारदौरा, त्यासाठीचे साहित्य, सभा, कार्यकर्त्यांचा लवाजमा आलाच. सभांसाठी मंडप, खुर्च्या, तसेच रोज कार्यकर्त्यांसाठी पाण्याच्या बाटल्या, चहा-नाश्ता, जेवण, प्रचारात फिरण्यासाठी वाहने, फलक, बॅनर, झेंडे, जाहिराती आदी गोष्टींवर उमेदवारांचा खर्च होत असतो. 

निवडणूक काळातील खर्च उमेदवाराने आपल्या नोंद वहीत लिहून ठेवून तो आठ दिवसांनी निवडणूक आयोगाच्या मतदारसंघातील संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करायचा असतो. तर, निवडणूक झाल्यावर ३० दिवसांत संपूर्ण खर्च त्यांनी सादर करायचा असतो. त्यात काही त्रुटी आढळल्यास आम्ही त्या उमेदवारांच्या लक्षात आणून देताे- वंदना सूर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान