लोकलच्या डब्यात फेरीवाल्यांची अरेरावी
By Admin | Updated: January 29, 2015 02:00 IST2015-01-29T02:00:08+5:302015-01-29T02:00:08+5:30
रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. मात्र ठरावीक डबेच महिलांसाठी राखीव ठेवल्यामुळे महिला डब्यात कायम गर्दी असते

लोकलच्या डब्यात फेरीवाल्यांची अरेरावी
नवी मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. मात्र ठरावीक डबेच महिलांसाठी राखीव ठेवल्यामुळे महिला डब्यात कायम गर्दी असते. याचाच फायदा घेत सध्या महिला डब्यात फिरत्या विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. याचा त्रास महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्यात असंतोष वाढू लागला आहे.
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर कामानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात महिलांच्या संख्या ही अधिक आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने महिलांसाठी १२ डब्यांच्या रेल्वेत दुसऱ्या वर्गाचे तीन डबे आणि प्रथम वर्गाचा अवघा एक डबा राखीव ठेवण्यात आला. त्यामुळे या डब्यात बहुतांशी वेळेत जास्त गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत फेरीवाल्यांनी अनधिकृत व्यवसाय सुरू केला. पुरुषांपेक्षा महिला डब्यात फेरीवाल्यांची वर्दळ ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वारंवार कारवाई केली जाते. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर फेरीवाले व्यवसाय करत असतील तर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन बोबडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)