अपघाताच्या तपासात बंद सीसीटीव्हीचा खो
By Admin | Updated: October 5, 2014 00:30 IST2014-10-05T00:30:27+5:302014-10-05T00:30:27+5:30
सिबीडीतील किल्ले गावठाण चौकात 22 सप्टेंबर रोजी अपघातात राजश्री पोळ जागीच मृत्यू झाला.

अपघाताच्या तपासात बंद सीसीटीव्हीचा खो
>नवी मुंबई : सिबीडीतील किल्ले गावठाण चौकात 22 सप्टेंबर रोजी अपघातात राजश्री पोळ जागीच मृत्यू झाला. दोन आठवडे उलटले तरी अपघाताचे कारण शोधण्यास पोलीसांना अद्याप यश आलेले नाही. घटनास्थळवरील सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने पोलीसांचा पुढील तपास रखडला आहे.
राजश्री पोळ सिबीडी येथून राहत्या घरी स्कुटीवरून नेरुळकडे जात होत्या. त्यांची गाडी किल्ले गावठाण जंक्शन लगत आली असता पाठिमागून आलेल्या अज्ञात वाहनाचा धक्का लागला. या अपघातात गाडीवरून पडून डोक्याला दुखापत झाल्याने राजश्री यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सिबीडी पोलिस ठाण्यात झाली असता पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमरे तपासले. मात्र किल्ले जंक्शन येथे बसवलेला मुख्य कॅमेराच बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अपघाताला कारणीभुत असलेल्या अज्ञात वाहनाची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. याच मार्गावर इतर ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात आले आहेत. मात्र ते उच्च दर्जाचे नसल्याने त्याचे फुटेज पोलिसांना उपयुक्त ठरलेले नाही. त्यामुळे पुढील तपास रखडला आहे.
दरम्यान या अपघाताची सखोल चौकशी व्हावी याकरीता पोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांचीही पोळ यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. जर घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे चालू असते तर अपघाताला कारणीभूत वाहनाचा शोध लागला असता असे त्यांचे म्हणणो आहे. त्यामुळे या प्रकारात पालिका प्रशासनावर हलगर्जीपणाचा ठपका त्यांनी ठेवला आहे. तर कोणी प्रत्यक्षदर्शी असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती पुरवावी असे आवाहन पोळ कुटुंबीयांनी केले आहे. (प्रतिनिधी)
राजश्री पोळ यांच्या अपघाताचा तपास सुरू आहे. किल्ले जंक्शनचा बंद सीसीटीव्हीमुळे अपघातास कारणीभूत वाहनाचा तपास लागला नाही. कॅमेरा सुरू असता तर तपास वेगात झाला असता. - विजय तायडे, पोलिस निरीक्षक, सिबीडी पोलिस ठाणो.