Join us

पहिले पुनर्वसन, मग पूल बंद करा; १९ चाळींतील रहिवासी आक्रमक; पूल बंद करायला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 09:49 IST

प्रकल्प बाधित होणाऱ्या चाळींना केवळ २५ ते ४० लाखांचा मोबदला मिळत असून तो तुटपुंजा आहे. तसेच सर्वांनाच योग्य मोबदला मिळावा एवढीच मागणी असल्याचे स्थानिक म्हणत आहेत

 मुंबई - एल्फिन्स्टन पूल बंद करण्यासाठी स्थानिकांनी विरोध केला असून सर्व १९ चाळींचे पुनर्वसन झाल्याशिवाय पूल बंद करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. तर आमच्या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या चाळींबाबत तसेच इतर सर्वांच्याच शंकांबाबत सोमवारच्या बैठकीत चर्चा होईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

चार पिढ्या आम्ही या ठिकाणी राहत आहोत. १०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या आमच्या चाळींचा, घरांचा योग्य मोबदला द्या; योग्य पुनर्वसन करा मग विकास काम करा. विकास कामाला विराेध नाही. मात्र, एमएमआरडीएने लेखी द्यावे, तसेच केवळ दोनच नाही तर सर्वच चाळींचे पुनर्वसन करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. 

प्रकल्प बाधित होणाऱ्या चाळींना केवळ २५ ते ४० लाखांचा मोबदला मिळत असून तो तुटपुंजा आहे. तसेच सर्वांनाच योग्य मोबदला मिळावा एवढीच मागणी असल्याचे स्थानिक म्हणत आहेत. तर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या मते प्रकल्प बाधितांना २५ लाख ते सव्वा कोटी इतकी तरतूद केली आहे. लक्ष्मी निवास आणि हाजीनुराणी या चाळी प्रकल्प बाधित होत आहेत. परंतु इतर १९ चाळींच्या रहिवाशांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर त्यांच्या चाळी कमकुवत होऊ शकतात. चाळी कमकुवत झाल्यावर महापालिका आम्हाला ट्रान्झिट कॅम्पचा पर्याय पुढे करणार. हे सर्व मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएचे खेळ असल्याचे स्थानिकांनी आरोप केले आहेत.

२०१८ पासून नोटीस दिली आहे. शिरोडकर मार्केटमध्ये पुनर्वसन प्रस्तावित होते. भाडे देणार होते. नंतर निर्णय फिरवला. आमच सर्व १९ इमारतीचं इथेच पुनर्वसन करून पुलाची बांधणी करावी एवढीच आमची रास्त मागणी आहे.  - श्रीराम पवार, स्थानिक रहिवासी, श्री समर्थ निवास.