सर्वांसाठी लोकल सुरू होणार, पण वेळांबाबत संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:35+5:302021-02-05T04:23:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल साेमवारपासून सुरू होणार आहे. मात्र लाेकल प्रवासासाठी सरकारने विशिष्ट ...

The local will start for everyone, but the confusion about the times remains | सर्वांसाठी लोकल सुरू होणार, पण वेळांबाबत संभ्रम कायम

सर्वांसाठी लोकल सुरू होणार, पण वेळांबाबत संभ्रम कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल साेमवारपासून सुरू होणार आहे. मात्र लाेकल प्रवासासाठी सरकारने विशिष्ट वेळा ठरवून दिल्या आहेत. मात्र वेळेचे निकष काय, मर्यादित वेळेत किती जणांनी प्रवास करायचा, कोरोनापूर्वी काढलेल्या पासचे काय होणार, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग हाेऊ नये म्हणून लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत होती.

आता काेराेना नियंत्रणात आल्याने १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, तसेच दुपारी १२ वाजल्यापासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

मात्र, सर्वसामान्य प्रवाशांनी रेल्वेच्या एखाद्या मार्गावर ठरलेल्या वेळेत प्रवास सुरू केला, पण त्यांचा प्रवास ठरलेल्या वेळेपेक्षा लांबला किंवा त्यांना दुसऱ्या मार्गावरून पुढचा प्रवास सुरू करायचा असेल आणि त्यातच त्यांना दिलेली प्रवासाची मुदत संपली, तर नेमके काय करायचे याबाबतही रेल्वने कोणतीही सूचना दिलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये वेळेबाबत संभ्रम आहे.

* आखून दिलेल्या वेळेनुसारच प्रवास करणे बंधनकारक!

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे प्रवासाच्या ज्या वेळा ठरवून दिल्या आहेत त्याचे प्रवाशांना पालन करावे लागेल. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाही या वेळा पाळाव्या लागतील. १५ जूनपासून लोकल सेवा अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाली तेव्हा २३ मार्चच्या पुढे जितके दिवस शिल्लक होते ते वाढवून देण्यात आले होते. १ फेब्रुवारीपासून शिल्लक दिवस पासमध्ये वाढवून दिले जातील. ज्या प्रवाशांचे पास हरवले आहेत त्यांचा रेल्वेकडे रेकॉर्ड नसतो. त्यामुळे त्यांना पुन्हा पास काढावा लागेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

.....................

Web Title: The local will start for everyone, but the confusion about the times remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.