रेल्वेच्या तीनही मार्गांवर लोकलचा बो-या

By Admin | Updated: September 27, 2014 03:08 IST2014-09-27T03:08:13+5:302014-09-27T03:08:13+5:30

लोकल प्रवाशांसाठी शुक्रवारचा दिवस गोंधळाचा गेला. मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर तांत्रिक बिघाड

Local trains on all three routes | रेल्वेच्या तीनही मार्गांवर लोकलचा बो-या

रेल्वेच्या तीनही मार्गांवर लोकलचा बो-या

मुंबई : लोकल प्रवाशांसाठी शुक्रवारचा दिवस गोंधळाचा गेला. मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने या तीनही रेल्वे सेवांचे वेळापत्रक कोलमडले आणि कामावर जाणाऱ्या अणि घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
वडाळा येथून मालगाडी बाहेर पडत असतानाच तिची चाके फक्त जागीच फिरू लागली. हा तांत्रिक बिघाड पहाटे ५च्या सुमारास झाला आणि हार्बर रेल्वे विस्कळीत झाली. मात्र या घटनेमुळे पनवेल आणि अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा बोऱ्या वाजला. अर्ध्या तासात ट्रेनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र या घटनेमुळे हार्बर मार्गावरील आठ लोकल रद्द करण्यात आल्या. रुळांवर तेल किंवा चाकांमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार होऊ शकतो, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या घटनेनंतर मध्य रेल्वेवर दुपारी ३.५0च्या सुमारास करी रोड स्थानकाजवळ कल्याणला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बिघाड झाला. बिघाड दुरुस्त होण्यास एक तासापेक्षा जास्त कालावधी लागल्याने मागून येणाऱ्या टिटवाळा, डोंबिवली आणि कुर्ला या गाड्या थांबून राहिल्या. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवली. परिणामी जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. बिघाड झालेली गाडी दुरुस्त करून ती नंतर कुर्ला कारशेडमध्ये नेली. या घटनेच्या वेळीच पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेनमध्येही तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडाबाबत ग्रँट रोड स्थानकात ट्रेन येताच मोटरमन आणि गार्डला समजले आणि त्यानंतर ट्रेन रद्द करून मुंंबई सेंट्रलला नेली. यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील ट्रेनही २० मिनिटे उशिराने धावत होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Local trains on all three routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.