Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 07:02 IST

सीएसएमटी ते दादर रेल्वेस्थानक दरम्यानच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद राहणार

मुंबई: प्रभादेवी पुलाचे मध्य रेल्वे भागातील पॅनल काढण्यासाठी शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते दादर रेल्वेस्थानक दरम्यानच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद राहतील.

प्रभादेवी पुलाचे पाडकाम अंतिम टप्प्यात आहे. आता मध्य रेल्वे मार्गावरील शेवटचे पॅनल काढल्यावर नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे. शेवटचा आणि मुख्य ब्लॉक शनिवारी रात्री ११:३० वाजता सुरु होणार असला तरी ओव्हेर हेड वायर हटविण्यासाठी संपूर्ण मार्गिका १ तास अगोदर बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शेवटची लोकल १०:३० वाजता सोडण्यात येईल.

प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १० तासांचा ब्लॉक

 ठाणे आणि डोंबिवली यादरम्यान प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्य रात्री १२ वाजता सुरू होणार असून, तो रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

या कालावधीत ठाणे आणि डोंबिवली स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. तर काही लोकल दादर किंवा कुर्ला स्थानकावरच समाप्त केल्या जातील अथवा तिथूनच सुरू होतील. तसेच कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर लोकल थांबणार नाहीत.

दोन्ही ब्लॉक कालावधीत सुमारे ३० मेल / एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि सीएसएमटीवरून सुटणाऱ्या मेल / एक्स्प्रेस दादर स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट आणि तिथूनच सुरु करण्यात येणार आहेत. तर काही एक्स्प्रेस सीएसएमटीवरून ब्लॉकनंतर त्यांच्या पुनर्निर्धारित वेळेनुसार सोडण्यात येणार आहेत.

रविवारी हार्बर मार्गावर दुपारी ३:५३ पर्यंत प्रवास जाच

रविवारी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान सकाळी ११:०५ ते सायंकाळी ४:०५ वाजेपर्यंत अप व डाऊन हार्बर मार्ग मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यानच्या हार्बर मार्ग सेवा रद्द राहतील, तसेच ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल-ठाणे दरम्यानच्या सेवा सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ या वेळेत रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येतील, तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांच्या दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांच्या दरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Central Railway Disruption: CSMT-Dadar Services Halted for Bridge Work

Web Summary : Central Railway faces disruption. CSMT-Dadar local services are suspended Saturday night to Sunday morning for Prabhadevi bridge work. Thane-Dombivli platform extension causes further block. Harbour line services also affected Sunday afternoon, with service cancellations between Panvel and CSMT.
टॅग्स :मुंबईलोकलमुंबई लोकल मेगा ब्लॉक