सर्वसामान्यांसाठी लोकल; महापालिकेचे तळ्यात-मळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST2020-12-04T04:18:31+5:302020-12-04T04:18:31+5:30
कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लागू केलेले लॉकडाऊन शिथिल होत असतानाच ...

सर्वसामान्यांसाठी लोकल; महापालिकेचे तळ्यात-मळ्यात
कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लागू केलेले लॉकडाऊन शिथिल होत असतानाच कोरोनावरही बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले जात आहे. परिणामी मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल १५ डिसेंबरनंतरच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची चिन्हे असली तरी याबाबतचा निर्णय कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच घेतला जाईल, असेही मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे दिल्लीच्या तुलनेत मुंबईने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने दिवाळीनंतर परराज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता इतर उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.
याच सकारात्मक बाबीमुळे १५ डिसेंबरनंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आठवडाभरात होणाऱ्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. कोरोना स्थितीचा आढावा घेऊनच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना याबाबत माहिती विचारण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र सूत्रांकडील माहितीनुसार, येत्या आठवडाभरात याबाबत बैठक होईल. या बैठकीला राज्य, महापालिका आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहतील. बैठकीत चर्चेअंती सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
* ...त्यानंतरच रेल्वे प्रशासनाला विनंती
१५ डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार आहे. तत्पूर्वी कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. एक ते दोन दिवस नेमकी काय स्थिती आहे हे पाहून त्यानंतरच रेल्वे प्रशासनाला विनंती केली जाईल. मात्र याचा अर्थ १५ डिसेंबर किंवा त्यानंतर लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होतील, असा घेता येणार नाही.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
------------------