स्थानिकांनाच प्रथम प्राधान्य : कदम

By Admin | Updated: September 20, 2015 23:42 IST2015-09-20T21:08:51+5:302015-09-20T23:42:45+5:30

शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या छायाचित्रणातून मिळविलेले लाखो रूपये दुष्काळग्रस्तांना वाटल्याचे त्यांनी सांगितले

Local first priority: step | स्थानिकांनाच प्रथम प्राधान्य : कदम

स्थानिकांनाच प्रथम प्राधान्य : कदम

खेड : राज्याच्या अन्य भागांप्रमाणे यंदा कोकणातदेखील पाऊस समाधानकारक झाला नाही़ याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर तसेच वीज निर्मितीवर होत आहे. कोयना नदीतील अवजल पाणी हे तेथील स्थानिक शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना डावलून मुंबईत नेता येणार नाही. कोयनेचे अवजल हा प्रथम स्थानिकांचा अधिकार आहे. त्यांना विश्वासात घेऊनच यथावकाश निर्णय घेतला जाणार असून, कोकणच्या मुळावर कोणी उठवल्यास ते खपवून घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे.जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोकणातील केमिकल झोनबाबतदेखील त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोणत्याही स्थितीत कोकणात केमीकल झोन उभारून कोकणचा पुन्हा कोळसा होऊ देणार नाही तसेच आवश्यकता वाटल्यास त्याविरोधात मोठे जनआंदोलन उभारू, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला़ खेड तालुक्यातील जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त ते आले आहेत. शनिवारी पत्रकारांना आपल्या कामकाजाबाबत माहिती देताना त्यांनी राज्यातील अनेक चांगल्या कामांची होत असलेल्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. केमिकल झोनबाबत बोलताना त्यांनी तारापूर औद्यौगिक वसाहतीमधील प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. याच धर्तीवर लोटे औद्यौगिक वसाहतीमधील सीइटीपीलादेखील आपण ताकीद दिली असून, प्रदूषण पूर्ण थांबवण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले.मराठवाडा आणि विदर्भातील ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, विजबिले भरण्यासाठी पैसे नाहीत़, वीज कनेक्शन नाही, घरात खायला अन्न नाही तसेच बँकांची कर्जे आहेत, अशा अठराविश्व दारिद्र्य असलेल्या शेतकरी आणि सामान्य नागरिकांना शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपयायोजना करण्यात आल्या आहेत. शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या छायाचित्रणातून मिळविलेले लाखो रूपये दुष्काळग्रस्तांना वाटल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटन विकासविषयक बोलताना यापुढे सीआरझेडची मर्यादा राहणार नसल्याचे सांगितले. मुंबईतील अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करत असताना त्याच धर्तीवर लागू करण्यात आलेल्या नियमावलींच्या आधारे कोकणातही सीआरझेड रद्द करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

शिवसेना राबणार शेतकऱ्यांसाठी
केंद्र आणि राज्याच्या लाभार्थींसाठी असलेल्या विविध योजनांना भरावयास लागणारी रक्कम शिवसेना देणार असून, याचा लाभ तेथील ८ जिल्ह्यांतील १ लाख ४ हजार शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गरीबांना मिळणारा ३ रूपयांप्रमाणे तांदुळ आणि २ रूपये दराने मिळणारा गहू यांचे पैसेदेखील शिवसेना भरणार आहे. हे धान्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेना करणार आहे. याशिवाय प्रत्येक निराधार शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रूपये देणार असून, शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा मिळण्यासाठी ८ जिल्हयांतील शेतकऱ्यांच्या ५०० एकर जागेवर मका आणि हत्ती गवताची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली.

कदम म्हणाले....
स्थानिक शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना डावलून पाणी मुंबईत नेता येणार नाही.
कोकणचा पुन्हा कोळसा होऊ देणार नाही.
आवश्यकता वाटल्यास मोठे जनआंदोलन उभारू.
कोयनेचे अवजल हा प्रथम स्थानिकांचा अधिकार.

Web Title: Local first priority: step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.