स्वयंचलित दरवाजा असणारी लोकल रविवारपासून
By Admin | Updated: March 14, 2015 01:44 IST2015-03-14T01:44:14+5:302015-03-14T01:44:14+5:30
लोकलमधून पडून मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने हे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता

स्वयंचलित दरवाजा असणारी लोकल रविवारपासून
मुंबई : लोकलमधून पडून मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने हे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. स्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकलची चाचणी यापूर्वी यशस्वी झाल्यानंतर त्याची चाचणी शुक्रवारीही पत्रकारांना सोबत घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली. त्या वेळी ही लोकल १५ मार्चपासून म्हणजेच रविवारपासून धावणार असल्याची माहिती रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली. या लोकलमधील फक्त प्रथम श्रेणीच्या महिला डब्याला स्वयंचलित दरवाजा बसविण्यात आला आहे. एक महिना या दरवाजाचे निरीक्षण करून त्याला मिळणारा प्रतिसाद पाहिला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लोकलमधून पडून सर्वाधिक अपघात होत असल्याने ते रोखण्यासाठी म्हणून स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी एका लोकलच्या प्रथम श्रेणीच्या महिला डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवून त्याची चाचणी महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये केली जात होती. त्यानंतर पश्चिम रेल्वेवरही या लोकलची चाचणी केल्यावर ती यशस्वी झाली. ही लोकल महालक्ष्मी ते बोरीवली स्थानकापर्यंत चालविण्यात आली रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले की, १५ मार्चपासून ही एकच स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावेल. महिनाभर निरीक्षण करून पुढील काही निर्णय घेतले जातील. महिला प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आठवडाभर महिला सेवक ठेवली जाईल, असे सूद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)