मुंबई : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या कामासाठी एमएमआरडीएच्या निधीतील अडचण दूर झाली आहे. या प्रकल्पासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने १५०० कोटी रुपयांचा कर्जाचा पहिला हप्ता मंजूर केला आहे. त्यामुळे आता लवकरच एमएमआरडीए कंत्राटदाराची नियुक्ती करणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त भागीदारीने रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेवर १४,४५४ झोपडीधारकांचे पुनर्वसन होणार आहे. पहिल्या टप्प्यात कामराजनगरमधील ४०५३ झोपड्यांच्या १७ एकर जागेवर ८५०० झोपडीधारकांसाठी घरे बांधली जातील. त्यानंतर उर्वरित भागातील झोपडीधारकांसाठी इमारती बांधल्या जातील. या प्रकल्पासाठी ८,४९८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील ३,९१६ कोटी कर्जाद्वारे उभारले जाणार आहेत. यातील पहिला १५०० कोटी रुपयांचा हप्ता मंजूर झाल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
झोपड्यांचे पाडकाम पूर्णया प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात भूखंडावरील झोपड्यांचे पाडकाम एसआरएने पूर्ण केले आहे. आता हा भूखंड एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया एसआरएने सुरू केली आहे. त्यामुळे पुनर्वसन इमारतींच्या उभारणीसाठी कंत्राटदार नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित पुनर्विकासासाठी आता ठोस पावले उचलली जात आहेत. प्रकल्प पूर्ण करता यावेत यासाठी सरकारने शाश्वत आर्थिक मॉडेल तयार केले आहे. ही केवळ योजना नाही, तर लोकांचा आत्मविश्वास परत मिळविण्याचा व समावेशक, न्याय्य शहरी विकास घडविण्याचा हा प्रयत्न आहे.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण निधीपैकी ४६ टक्के रक्कम संस्थात्मक कर्जाच्या आणि ३९ टक्के रक्कमअंतर्गत महसुलाच्या माध्यमातून उभारली जाणार आहे. त्यातून एमएमआरडीए आर्थिक शिस्त राखत आहे. रमाबाई आंबेडकरनगरचा पुनर्विकास संपूर्ण एमएमआरसाठी आदर्श ठरेल.डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए.