सर्वांत कमी वजनाच्या अर्भकाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 06:03 IST2018-06-22T06:03:26+5:302018-06-22T06:03:26+5:30
मुदतपूर्व प्रसूतीत देशातील सर्वांत कमी वजनाच्या बाळाला जन्म दिलेल्या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे.

सर्वांत कमी वजनाच्या अर्भकाला जीवदान
मुंबई : मुदतपूर्व प्रसूतीत देशातील सर्वांत कमी वजनाच्या बाळाला जन्म दिलेल्या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे. तसेच जन्माच्या वेळी ४५० ग्रॅम असलेले तिच्या बाळाचे वजन अवघ्या ११० दिवसांत २.५ किलोपर्यंत वाढविण्यात अंधेरीतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.
श्रेया संतोष शिंदे ही महिला २६ आठवड्यांची गरोदर असल्याचे, मात्र गर्भातील बाळाची वाढ २४ आठवड्यांएवढीच झाल्याचे निदान ‘अल्ट्रासोनोग्राफी’द्वारे झाले होते. श्रेयाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे १६ फेबु्रवारी रोजी तिची मुदतपूर्व प्रसूती करण्यात आली. तिने जन्म दिलेल्या स्वरा या मुलीचे जन्मत: वजन ४५० ग्रॅम होते. त्यामुळे तिला चार महिने ‘एनआयसीयू’मध्ये ठेवण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि नलिकेद्वारेच तिला अन्न देण्यात येत होते. या उपचारांमुळे तब्बल ११० दिवसांनंतर स्वराचे वजन २.५ किलो झाले आहे.
निओनास्टोलॉजिस्ट डॉ. प्रीथा जोशी यांनी सांगितले की, या स्वराची काळजी घेणे आव्हानात्मक होते, तर या प्रसूतीवेळी उपस्थित असणारे डॉ. संजीव वेंगलथ म्हणाले, मुदतपूर्व प्रसूतीदरम्यान महिलेला केंद्रस्थानी ठेवून तिच्या बाळावर उपचार केले जातात. त्यात आम्हाला दोघांनाही सुखरूप ठेवण्यात यश आले.
>मार्गदर्शन मोलाचे
निओनास्टोलॉजिस्ट डॉ. विनय जोशी यांनी प्रसूतीपूर्वीच शस्त्रक्रियेमधील गुंतागुंत सांगून आधीच मानसिक तयारी करून घेतली होती. मात्र, ११० दिवसांनंतर स्वराची प्रकृती अगदी ठणठणीत आहे, याचा अत्यानंद होत आहे.
- संतोष काशीराम शिंदे, बाळाचे वडील
>राज्यात प्रसूतीदरम्यान अर्भक मृत्यूदर दरहजारी २४
नऊ महिन्यांनंतर जन्म दिलेल्या अर्भकांचे वजन सर्वसाधारणपणे २.५ ते ३ किलो दरम्यान असते. मुदतपूर्व जन्म झालेल्या आणि १ किलो वजन असलेल्या अर्भकांचा जीव वाचण्याचे प्रमाण साधारणपणे ७० ते ८० टक्के एवढे असते. महाराष्ट्रामध्ये प्रसूतीदरम्यान अर्भकांचा मृत्यूदर हा १००० मध्ये २४ एवढा आहे. त्यापैकी २-३ अर्भकांचा जन्म हा प्रसूतीपूर्व झालेला असतो, अशी माहिती अंधेरी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.