वृक्षांना तूर्तास जीवदान
By Admin | Updated: March 25, 2015 02:25 IST2015-03-25T02:25:01+5:302015-03-25T02:25:01+5:30
मेट्रो ३ कारशेडसाठी आरे कॉलनीतील २२९७ वृक्ष छाटण्याचा प्रस्ताव तूर्तास पालिकेने लांबणीवर टाकला आहे़

वृक्षांना तूर्तास जीवदान
मुंबई : मेट्रो ३ कारशेडसाठी आरे कॉलनीतील २२९७ वृक्ष छाटण्याचा प्रस्ताव तूर्तास पालिकेने लांबणीवर टाकला आहे़ या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या समितीचा निर्णय आल्यानंतरच गोरेगावमधील या हरितपट्ट्याचे भवितव्य ठरणार आहे़ परंतु हा प्रस्ताव राखून ठेवताना विविध प्रकल्पांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सुमारे हजार वृक्षांची छाटणी व पुनर्रोपणाचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीने आज मंजूर केला आहे़
बोरीवली, कांदिवली, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव येथील ४१ प्रकल्पांसाठी वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या पटलावर आज मंजुरीसाठी आले होते़ भांडुप येथील पुनर्विकास प्रकल्पात ५९४ वृक्षांचा अडथळा ठरत आहे़ यापैकी २७२ वृक्षांचे पुनर्रोपण होणार आहे़ तसेच दहिसर आणि अंधेरी येथील वृक्षांच्या पुनर्रोपण व छाटणीच्या प्रस्तावांना आज मंजुरी देण्यात आली़ यामध्ये आरे कॉलनीतील वृक्षांना मात्र तूर्तास जीवदान मिळाले आहे़
विविध स्तरांतून तीव्र विरोध होताच आरे कॉलनीतील वृक्षतोडीच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती बसविली आहे़ आरे कॉलनी व प्रकल्पाचा अभ्यास केल्यानंतर ही तज्ज्ञ समिती आपला अहवाल सादर करणार आहे़ तोपर्यंत वृक्षतोडीचा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला आहे़ त्याचबरोबर वांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तेथील वृक्षतोडीचा प्रकल्पही राखून ठेवण्यात आला
आहे़ (प्रतिनिधी)
सुनावणी उरकल्यानंतर
जातात निरोप
वृक्षतोडीबाबत आक्षेप घेणारे नगरसेवक अथवा संस्थांना सुनावणीसाठी उद्यान विभागामार्फत बोलाविण्यात येते़ परंतु ही सुनावणी उरकल्यानंतर दुसऱ्या दिवशी याबाबतचा निरोप मिळत असल्याची तक्रार वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य अभिजित चव्हाण यांनी केली़ मनसेचे दिलीप लांडे यांनीही हीच तक्रार केली़ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आयुक्त सीताराम कुंटे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़