सात मतदारसंघात थेट लढत
By Admin | Updated: August 9, 2014 00:31 IST2014-08-08T23:41:51+5:302014-08-09T00:31:41+5:30
आखाडा विधानसभेचा : आघाडी-महायुतीचे पैलवान तयार

सात मतदारसंघात थेट लढत
विश्वास पाटील - कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहापैकी तब्बल सात ठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र आताच स्पष्ट झाले आहे. निवडणुकीची आचारसंहिता १५ आॅगस्टपासून लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार, हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व शरद पवार यांच्यातील चर्चेनंतर अपेक्षेप्रमाणे नक्की झाले आहे. महायुतीचे जागावाटप झाले नसले, तरी कुणी किती जागा लढवायच्या यावरून तणातणी होऊ शकते; परंतु तरीही लोकसभेप्रमाणे महायुतीही पाच घटकपक्षांसह विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार, हे नक्की आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांपैकी तब्बल सतरा उमेदवारांची उमेदवारीही नक्की असून, त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. आताचे विधानसभानिहाय चित्र पाहिले, तर लढतीचा अंदाजही येऊ लागला आहे. दहापैकी शाहूवाडी, राधानगरी व चंदगड मतदारसंघांतच तिरंगी लढतीचे चित्र दिसते. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस व कोल्हापूर दक्षिणमध्ये महायुतीकडून उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये डाव्यांकडून उमेदवार रिंगणात राहील की नाही, हीच साशंकता आहे; परंतु कम्युनिस्टांकडून मेघा पानसरे व रघुनाथ कांबळे यांची नावे पुढे आली आहेत. करवीरमध्ये आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध पी. एन. पाटील यांची लढत होणार हे स्पष्ट आहे. तिथे जनसुराज्यही रिंगणात उतरणार आहे. त्यांचा उमेदवार पन्हाळ्याचा की करवीरचा असणार, यावर कुणाची डोकेदुखी वाढणार हे ठरणार. कागलची लढतही जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे अशी होणार आहे. तिथे विक्रमसिंह घाटगे गटाच्या भूमिकेस महत्त्व आले आहे.
राधानगरीत आमदार के. पी. पाटील यांच्याविरोधात जेवढे जास्त उमेदवार रिंगणात राहतील, तेवढी के. पी. यांची लढत सोपी होईल. आतातरी प्रकाश आबिटकर व जालंदर पाटील यांच्यासह तिरंगी लढत दिसते. शाहूवाडीमध्ये आज तरी काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा अजून उमेदवारच ठरलेला नाही. महायुतीतील शिवसेनेतही उमेदवारीवरून सुंदोपसुंदी आहे. हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहणार की स्वाभिमानी शेतकरी
संघटनेकडे जाणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. महायुतीचा उमेदवार किती ताकदीचा राहतो, यावर जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांना निवडणूक कशी जाणार हे ठरणार आहे. चंदगडमध्ये राष्ट्रवादीविरोधात लाट आहेच; परंतु उमेदवारीचा गुंताही सुटता सुटेना झाला आहे. तथापि, सद्य:स्थितीत नंदा बाभूळगावकर यांचेच नाव राष्ट्रवादीतून पुढे दिसते. इचलकरंजीत काँग्रेसचे प्रकाश आवाडे विरुद्ध भाजपचे सुरेश हाळवणकर यांच्यातच झुंज होईल. तिथे भाजपकडून मिश्रीलाल जाजू व राष्ट्रवादीकडून मदन कारंडे यांची नावे चर्चेत आहेत. हातकणंगलेत जयवंतराव आवळे यांनीच पुन्हा शड्डू ठोकला असल्याने लढतीत नक्कीच रंग भरणार आहे. प्रत्येक मतदारसंघात तशी इच्छुकांची संख्या मोठी आह; परंतु इच्छा असणे व प्रत्यक्षात तशी ताकद असणे यांत फरक आहे.
असे आहे सध्याचे बलाबल
राष्ट्रवादी (०३) : हसन मुश्रीफ (कागल), के. पी. पाटील (राधानगरी), संध्यादेवी कुपेकर (चंदगड)
शिवसेना (०३) : राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिणचेकर (हातकणंगले)भाजप (०१): सुरेश हाळवणकर (इचलकरंजी)जनसुराज्य (०१) : विनय कोरे (शाहूवाडी)