‘त्या’ १२ जणांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST2021-06-16T04:07:28+5:302021-06-16T04:07:28+5:30

अपिलावर सुनावणीतून उघड; कार्यालयाकडे न देता स्वतःकडे ठेवल्याचे स्पष्ट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषद ...

The list of names of 'those' 12 is with the governor | ‘त्या’ १२ जणांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच

‘त्या’ १२ जणांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच

अपिलावर सुनावणीतून उघड; कार्यालयाकडे न देता स्वतःकडे ठेवल्याचे स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषद सदस्य नियुक्तीसाठी ज्या १२ लोकांची नावे पारित करून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली होती ती यादी सचिवालयात नसून दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वतःकडे ठेवल्याचे उघड झाले आहे. त्यांनी त्याबाबत निर्णय घेतल्यानंतर त्याचा तपशील उपलब्ध होईल.

राजभवनात त्याबाबत मंगळवारी झालेल्या अपील सुनावणीतून ही धक्कादायक बाब समोर आली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी त्याबाबत अपील केले होते. आरटीआयअंतर्गत प्रश्नावर राजभवन सचिवालयाने उत्तर देताना संबंधित यादी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र, आजच्या सुनावणीतून राज्यपालांनी संबंधित यादी वर्षभरापासून आपल्याकडेच ठेवून घेतल्याचे स्पष्ट झाले.

गलगली यांनी केलेल्या प्रथम अपील अर्जावर उपसचिव प्राची जांभेकर यांच्याकडे मंगळवारी सुनावणी झाली. गलगली यांनी यादी उपलब्ध नसल्यास ती कोणाकडे उपलब्ध आहे, असा सवाल केला. राज्यपालांकडे यादीसह संपूर्ण नस्ती आहे आणि निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे जांभेकर यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती द्यावी किंवा नाही? याबाबत सल्लामसलत केली जाईल.

गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे २२ एप्रिलला माहिती मागितली होती की, मुख्यमंत्री/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधान परिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपालांकडे सादर केलेली यादी देण्यात यावी, तसेच मुख्यमंत्री/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधान परिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपालांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्य:स्थितीची माहिती द्यावी. त्यावर १९ मे रोजी राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी यादी जन माहिती अधिकारी ( प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, उपलब्ध करून देता येत नाही, असे कळविले होते.

.........................................

Web Title: The list of names of 'those' 12 is with the governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.