युवासेनेची कुलगुरूंकडे मागण्यांची यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:55 IST2018-05-03T05:55:02+5:302018-05-03T05:55:02+5:30
नवीन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचा विस्कळीत कारभार, परीक्षा विभागातील अनागोंदी, मुंबई विद्यापीठाची ढासळलेली प्रतिमा पुन्हा एकदा पूर्वपदावर आणतील

युवासेनेची कुलगुरूंकडे मागण्यांची यादी
मुंबई : नवीन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचा विस्कळीत कारभार, परीक्षा विभागातील अनागोंदी, मुंबई विद्यापीठाची ढासळलेली प्रतिमा पुन्हा एकदा पूर्वपदावर आणतील, अशी अपेक्षा सिनेट सदस्यांनी कुलगुरूंकडे केली आहे. कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुहास पेडणेकर यांचे अभिनंदन करत, बुधवारी सिनेट सदस्यांनी सुधारणांची यादीच त्यांच्यासमोर मांडली आहे.
मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाबद्दल सांगताना, विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागावेत आणि त्यांचे पदवी प्रमाणपत्रही वेळेत मिळावे, अशी प्रमुख मागणी कुलगुरूंकडे युवासेनेच्या सदस्यांनी केली आहे, तसेच परीक्षा भवनाच्या तळमजल्यावर विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्कची व्यवस्था करावी, परीक्षकांना पद्धतशीर मॉडेल सोल्युशन द्यावे, उपकेंद्रांमध्ये पदवी प्रमाणपत्र, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज, निकालपत्र, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र आदी सोय उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या.