धोकादायक इमारतींच्या यादीत घोळ ?
By Admin | Updated: June 3, 2015 23:06 IST2015-06-03T23:06:51+5:302015-06-03T23:06:51+5:30
अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी पालिकेने जरी जाहीर केली असली तरी त्यात घोळ असल्याची बाब बुधवारच्या स्थायी समितीच्या

धोकादायक इमारतींच्या यादीत घोळ ?
ठाणे : अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी पालिकेने जरी जाहीर केली असली तरी त्यात घोळ असल्याची बाब बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली. काही अतिधोकादायक इमारती यापूर्वीच पाडल्या आहेत, तर काही दुरुस्तदेखील केल्या आहेत. तसेच काहींचे मालक बदलले आहेत. मात्र, अशा सर्वच इमारतींचा समावेशदेखील धोकादायक इमारतींच्या यादीत केल्याचा प्रताप प्रशासनाने केला आहे.
पावसाळा आला की, धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. ठाणे शहरात सध्या ५८ अतिधोकादायक इमारती असून त्यातील १० इमारतींवर कारवाई करून ७ इमारती रिकाम्या केल्या आहेत. तर २५६६ या धोकादायक इमारती असून यापैकी काही इमारतींची दुरुस्ती केली आहे. पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेकडून अशा धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली जाते. बुधवारच्या स्थायीच्या बैठकीमध्ये यांसदर्भात सदस्य संजय वाघुले आणि मनोज शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. पालिकेने ज्या इमारतींचा धोकादायक यादीमध्ये समावेश केला आहे, त्यातील काही इमारती यापूर्वीच पाडल्या आहेत. तर काहींची दुरु स्तीदेखील केली असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी प्रशासनासमोर उघड केली.
परंतु, प्रशासन केवळ दरवर्षी संगणकामध्ये एंटरचे बटण दाबून तीचतीच यादी जाहीर करते, असा आरोपही सदस्यांनी केला. कळव्यातील ज्या इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत, त्यांचे अद्याप स्ट्रक्चरल आॅडिट झाले नसल्याचा गौप्यस्फोट सदस्य मिलिंद पाटील यांनी केला. एखादी इमारत धोकादायक आहे अथवा नाही, हे स्ट्रक्चरल आॅडिट न करताच पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जाहीर केले जाते. त्यामुळे काही इमारती या विकासकांच्या फायद्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिट न करताच जाहीर केल्या जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.