Join us  

काँग्रेसची यादी पाहून खूप 'सरप्राइज' मिळतील; सत्यजीत तांबेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 6:42 PM

योग्य आणि चांगले उमेदवार देण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच सरप्राइज मिळेल.

मुंबई - काँग्रेस युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी म्हणजे सरप्राईज असेल, असे सांगत गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झाली नाही. पण, उमेदवारांची ताकद आणि निवड पाहण्यासारखी असेल, असे तांबे यांनी सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील काही जागांवर अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे उमेदवारांची यादी रखडल्याचे दिसून येते.     

योग्य आणि चांगले उमेदवार देण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच सरप्राइज मिळेल. काँग्रसेची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर नाना पटोले यांचे नाव पाहून अनेकांना धक्का बसला. नागपूरमध्ये नितिन गडकरींना निवडणूक सोपी जाईल, असे अनेकांचे मत होते. मात्र, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच, तेथील चित्र बदलले आहे. त्यामुळे लोकसभेच्या आगामी उमेदवारांची यादी झाल्यानंतरही पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का सर्वांनाच बसेल. कारम, ही यादी म्हणजेही सरप्राईज असेल, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले. तसेच, नाना पटोले 100 टक्के निवडून येतील आणि काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार ताकदीचा आणि जिंकण्याची क्षमता असणारा असेल, असेही तांबे यांनी ठामपणे सांगितले. 

तसेच सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबतही त्यांनी स्पष्टपणे आपले मत मांडले. अहमदनगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे पाटील यांचा संघर्ष खूप पूर्वीपासूनचा आहे. 1975-76 च्या आधीपासून हा संघर्ष आहे. वसतंदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांच्यातील गटातटाच्या राजकारणामध्ये विखे पाटील घराणं हे शंकरराव चव्हाणांच्या पाठिशी होते. त्यातून हा सत्तासंघर्ष सुरू आहे. त्याचा फटका काँग्रेस पक्षाला झाला आहे हे नाकारता येणार नाही. 2009 मध्ये विधानसभेच्या मतदारसंघात फेररचना करण्यात आली. त्यामध्ये बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातील 28 गावं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात गेली. त्यावेळी थोरातांनी जर भूमिका घेतली असती तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव झाला असता असा गौप्यस्फोट डॉ.सत्यजीत तांबे यांनी केला आहे. लोकमत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तांबे यांनी जनतेशी संवाद साधला. 

टॅग्स :काँग्रेससत्यजित तांबेलोकसभा निवडणूक