पहाटे चार वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांगा, कन्नमवारनगर, टागोरनगरमधील ज्येष्ठांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:01 AM2021-05-12T10:01:19+5:302021-05-12T10:04:37+5:30

विक्रोळी, टागोर नगर येथील लसीकरण केंद्राजवळ येऊन ज्येष्ठ नागरिक रांगा लावतात, पण लसीकरण केंद्रातील कर्मचारी सकाळी साडेनऊ वाजता येऊन लसीचा साठा नसल्याचे कारण सांगून त्यांना परत जायला सांगतात.

Line at vaccination centers from 4 a.m. in mumbai | पहाटे चार वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांगा, कन्नमवारनगर, टागोरनगरमधील ज्येष्ठांचे हाल

पहाटे चार वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांगा, कन्नमवारनगर, टागोरनगरमधील ज्येष्ठांचे हाल

Next

मुंबई : शासनाकडून लसीकरणाबाबत नीट माहिती दिली जात नाही. वेळोवेळी कार्यपद्धती बदलली जाते. शिवाय लसीच्या उपलब्धतेबाबत लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून पुरेशी माहिती मिळत नाही, अशी नाराजी विक्रोळी येथील कन्नमवार नगर व टागोर नगरमधील नागरिकांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतु त्यांना दुसरा डोस मुदतीत मिळत नसल्याने अडचणी वाढत आहेत. ताे मिळवण्यासाठी ते पहाटे चार वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत.

पहाटे ४ वाजल्यापासून 
विक्रोळी, टागोर नगर येथील लसीकरण केंद्राजवळ येऊन ज्येष्ठ नागरिक रांगा लावतात, पण लसीकरण केंद्रातील कर्मचारी सकाळी साडेनऊ वाजता येऊन लसीचा साठा नसल्याचे कारण सांगून त्यांना परत जायला सांगतात. लसीचा साठा नसेल तर कर्मचाऱ्यांनी आधीच तशा सूचना गेटवर लावल्या पाहिजेत. लसीचा साठा उपलब्ध झाला तर ते नागरिकांना कसे कळवता येईल याची खबरदारी घेतली पाहिजे. परंतु लसीकरण केंद्रातील कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. लसीकरणाच्या अपुऱ्या माहिती व मार्गदर्शनामुळे सकाळच्या वेळेत लसीकरण केंद्रावर फार मोठी गर्दी असते, तेथे सोशल डिस्टन्सिंगचे कोणत्याही प्रकारे पालन होत नाही. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यापेक्षा तो वाढण्याची शक्यता जास्त आहे, अशी भीतीही येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती 
विक्रोळी विभागातील ७० ते ८० वर्षाचे ज्येष्ठ नागरिक लसीचा दुसरा डोस मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करत असल्याचे पहायला मिळत आहे. हे नागरिक पहाटे लवकर उठून ४ ते ५ तास रांगेत उभे राहतात. त्यानंतर केंद्र उघडल्यावर लस नसल्याचे सांगून त्यांना माघारी पाठवण्यात येते, असे येथील प्रकाश सोनमळे यांनी सांगितले. 

नोंद अपडेट नसल्याने दुसरा डोस नाही
८ मे पासून टागोर नगर येथील लसीकरण केंद्रावर असे सांगण्यात येत आहे की, लसीचा दुसरा डोस घेण्याकरिता रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. 
कन्नमवार नगर व टागोर नगर येथील मध्यमवर्गीय कामगार वसाहतीमधील ६० ते ८० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सक्षम आहेत का ? याचा कोणी विचार केलेला नाही. 

काही लोकांचे रजिस्ट्रेशन करून देताना असे आढळून आले आहे की, बऱ्याच नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. परंतु कोविन ॲपमध्ये त्याची नोंद अपडेट झालेली नसल्याने त्यांना दुसरा डोस घेता येत नाही.

नोंद न होणे ही प्रशासनाची चूक 
- पहिला डोस घेतल्याची नोंद अपडेट न होणे ही प्रशासनाची चूक असताना त्याची शिक्षा या ज्येष्ठ नागरिकांनी का भोगावी ? असा सवाल ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. 
- टागोर नगर येथील क्रांतिवीर महात्मा फुले हॉस्पिटल व्यतिरिक्त कोणत्याही खासगी अथवा शासकीय हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची सोय नाही. . 
- अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ज्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे त्यांच्यासाठी विशेष कक्ष स्थापन करून व्यवस्था केली पाहिजे, अशी मागणी आहे. 
- तर, शासनाची संमती असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्याकरिता जागा, नर्स व इतर कर्मचारी स्वखर्चाने पुरविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे यशोदीप फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश सोनमळे यांनी सांगितले.
 

Web Title: Line at vaccination centers from 4 a.m. in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.