तिसऱ्या दिवशीही बत्ती गुल!
By Admin | Updated: July 17, 2015 02:26 IST2015-07-17T02:26:51+5:302015-07-17T02:26:51+5:30
पावसाने दडी मारल्याचा फटका आता ऊर्जा क्षेत्रालाही बसू लागला आहे. वाढत्या वीज मागणीमुळे बुधवारीही राज्यभरात काही ठिकाणी दुपारी १२ वाजेपर्यंत भारनियमन करण्यात आले

तिसऱ्या दिवशीही बत्ती गुल!
मुंबई: पावसाने दडी मारल्याचा फटका आता ऊर्जा क्षेत्रालाही बसू लागला आहे. वाढत्या वीज मागणीमुळे बुधवारीही राज्यभरात काही ठिकाणी दुपारी १२ वाजेपर्यंत भारनियमन करण्यात आले. वीजेच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे महावितरणने सोमवारसह मंगळवारीही भारनियमन केले होते. तर बुधवारी दुपारीनंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर भारनियमन रद्द करण्यात आल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
१५ दिवसांत वीजेच्या मागणीत सुमारे साडेतीन हजार मेगावॅटने वाढ झाल्याने सोमवारी राज्यात काही प्रमाणात अघोषित भारनियमन करण्यात आले. मंगळवारी वीजेची मागणी १६ हजार ५०० मेगावॅटने वाढली. त्यामुळे वीजेची उपलब्धता सुमारे साडेपंधरा हजार मेगावॅट असल्याने वीज यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी अघोषित भारनियमन करण्यात आले.
पावसाने मारलेली दडी, वातावरणातील उकाडा, ग्राहकांचा वाढता वीज वापर आणि कृषीग्राहकांची वाढती मागणी अशा अनेक कारणांमुळे भारनियमन वाढले आहे. भारनियमनाच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण वीज विकत घेत आहे.
सोमवारी पॉवर एक्सचेंजमधून सुमारे १ हजार २०० मेगावॅट वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. तर मंगळवारी केंद्रीय ग्रीडमधून वीज घेवूनही तीव्रतेत तफावत दिसून आली. परिणामी भारनियमनाचे प्रमाण वाढले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्सचेंजमधून काही तासांसाठी वीज विकत घेण्यात आली. बुधवारी मागणी, पुरवठ्यातील तफावत कमी झाल्याने बुधवारी झालेले भारनियमन दुपारनंतर रद्द करण्यात आले. (प्रतिनिधी)