पनवेलच्या पुलाखाली एलईडीचा उजेड

By Admin | Updated: May 17, 2015 23:24 IST2015-05-17T23:24:35+5:302015-05-17T23:24:35+5:30

इलेव्हेटेड रोडवरील पथदिवे दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आल्याने ‘पनवेलच्या मानबिंदू’वर उजेड पडला, मात्र पुलाखाली दिवे

The light of the LED under the bridge of Panvel | पनवेलच्या पुलाखाली एलईडीचा उजेड

पनवेलच्या पुलाखाली एलईडीचा उजेड

पनवेल : इलेव्हेटेड रोडवरील पथदिवे दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आल्याने ‘पनवेलच्या मानबिंदू’वर उजेड पडला, मात्र पुलाखाली दिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य असे. मात्र या ठिकाणी रस्ते विकास महामंडळाने बसवलेले एलईडी दिवे सुरू झाल्यामुळे लखलखाट झाला आहे. उजेडामुळे अपघात टाळता येतील आणि चोर व गर्दुल्ल्यांवर वचक राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पुलाचे काम झाल्यानंतर गार्डन हॉटेल ते तक्का अशा दीड किमीच्या या पुलावर व खाली ठेकेदाराने पथदिवे बसवले. त्याकरिता महावितरणकडून नियमानुसार वीज मीटर घेतले. त्यांनी सिग्नल यंत्रणाही बसवून दिली. काही दिवस हे दिवे सुरू होते मात्र त्यानंतर बंद पडले. दिव्यांचे सुमारे एक लाखांपेक्षा जास्त वीजबिल थकले होते. महावितरणने वीजपुरवठा खंडित करून मीटरही काढून नेले. त्यामुळे सर्व पथदिवे बंद झाले होते.
इथे काही ठिकाणी गतिरोधक आणि उतारावर रम्बलर आहेत, अंधार असल्याने ते दिसत नसल्याने दररोज लहान-मोठे अपघात घडून वाहनचालकांची गैरसोय होत होती. रस्ते विकास महामंडळाकडे वीजबिल भरण्यासाठी निधी नसल्याने यावर तोडगा निघत नव्हता, शेवटी पनवेल नगरपालिकेने वीजबिल अदा केले. परंतु मध्यंतरी येथील रोहित्रच चोरीला गेले. परिणामी वीजबिल भरूनही हा पूल अंधारातच होता. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी नवीन रोहित्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होऊन पथदिवेही सुरू झाले. पुलावर उजेड पडला असला तरी खाली मात्र दिवे बंद असल्याने अंधार कायम होता.
इलेव्हेटड रोडखाली अंधारामुळे गर्दुल्ल्यांचे फावत असल्याने त्यांचा अड्डा झाला होता. चोवीस तास अनेकजण त्या ठिकाणी पडून असत. मात्र या ठिकाणी दिवे पेटल्याने अंधार नाहीसा झाला आहे. अंधाराचा गैफायदा घेऊन पुलाखाली केल्या जाणाऱ्या अनैतिक उद्योगांनाही त्यामुळे चाप बसणार आहे. (वार्ताहर)

Web Title: The light of the LED under the bridge of Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.