Join us

गर्दी अचानक की पूर्वनियोजित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 02:40 IST

१८ एप्रिलच्या आंदोलनावर प्रकाश पडल्याने धोका टळला

मुंबई : वांद्रे स्थानकाबाहेर जमलेली परप्रांतीयांची गर्दी अचानक जमली की पूर्वनियोजित कट होता? याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने गर्दी जमली कशी, याबाबत पोलिसांकडून सारवासारव सुरू आहे. वांद्रे प्रकरणामुळे विनय दुबेचा चेहरा समोर येत, १८ एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे होणाऱ्या मजुरांच्या आंदोलनावर प्रकाश पडला.

वांद्रे पश्चिमेकडील बेस्ट डेपोजवळ लॉकडाउनच्या काळात दररोज स्वयंसेवी संस्थेकडून शिधा, तयार अन्नाचे वाटप होते. मंगळवारीही एका संस्थेने शिधा वाटण्याचे ठरविले. जवळच्या प्रार्थनास्थळातून याबाबत उद्घोषणा सुरू होत्या. त्यामुळे धान्य घेण्यासाठी येथे काही प्रमाणात नागरिकांची गर्दी होतीच.या भागात मोठी मुस्लीम वस्ती आहे. त्यामुळे एरवी कुठल्याही प्रहरी या ठिकाणी एकाच वेळी दीडशे ते दोनशे लोक रस्त्यावर असतात. सध्या लॉकडाउनमुळे ही मंडळी घरात आहेत. त्यात १४ तारखेला लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल होईल आणि घरी जायला मिळेल अशी अपेक्षा येथील मजुरांना होती. मात्र तसे झाले नाही. अशातच परप्रांतीयांना घरी जायला मिळणार असल्याची चर्चा पसरली. आणि ते पाहण्यास अचानक तीननंतर परप्रांतीय मजुरांचे जत्थे आले आणि या गर्दीत मिसळले. गर्दी वाढल्यानंतर आम्हाला धान्य नको, तात्पुरती मदत नको, आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, अशी मागणी पुढे आली. ही सर्व गर्दी स्थानिकच होती. कारण गर्दी पांगवल्यानंतर जास्त पळापळ न होता नागरिक थेट घरी गेले. तसेच त्यांच्या हातात सामानही नव्हते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकड़ून समजते आहे.मुळात या गर्दीबाबत पोलीस इतके गाफील कसे? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह वरिष्ठ अधिकारी याबाबत जास्त बोलणे टाळत आहेत.ही गर्दी पूर्वनियोजित असल्याचे एका व्हिडीओतून समोर येत आहे. सर्वांनी चार वाजता एकत्र यायचे, असे यातील संभाषणातून समोर येत आहे. याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. त्यामुळे हे पूर्वनियोजित होते का? या दिशेने तपास सुरू आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यावांद्रे पश्चिममुंबई