मुंब्य्रात धोकादायक इमारतींना लागल्या लिफ्ट
By Admin | Updated: November 16, 2014 23:34 IST2014-11-16T23:34:41+5:302014-11-16T23:34:41+5:30
कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांत अनधिकृतपणे उभारलेल्या इमारतींवर ठाणे महापालिकेने अनेकदा कारवाई करून त्या धोकादायक म्हणून जाहीर केल्या असतानाही

मुंब्य्रात धोकादायक इमारतींना लागल्या लिफ्ट
घोडबंदर - कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांत अनधिकृतपणे उभारलेल्या इमारतींवर ठाणे महापालिकेने अनेकदा कारवाई करून त्या धोकादायक म्हणून जाहीर केल्या असतानाही त्यात लिफ्ट बसवून ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम सुरू झाले आहे. अशा धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याची मागणी जीवन नागरी एवं पर्यावरण संस्थेने पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे केली आहे.
शीळफाटा इमारत दुर्घटनेत ७४ जणांचा बळी गेल्यानंतर पालिकेने संपूर्ण शहरातील बेकायदा बांधकामांना लक्ष्य केले होते. यात कळवा, मुंब्रा, दिवा येथील अनधिकृत इमारतींचा सर्वाधिक समावेश असल्याने पालिकेने त्या इमारतींवर हातोडा मारला होता. कारवाई केल्याने अशा इमारतींचा ढाचा खिळखिळा झाला असताना लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता काळात तोडलेल्या इमारती पुन्हा उभारून त्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लिफ्टदेखील बसवण्यात आल्या आहेत.
हा विभाग खाडीसदृश असल्याने येथील जमीन भुसभुशीत आहे. त्यामुळे ही बांधकामे अतिधोकादायक होऊन कधीही कोसळू शकतील, अशी भीती व्यक्त होत आहे. खारफुटी तोडून झालेल्या बांधकामांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असल्याने संस्थेने कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)