लाइफ जॅकेट बंधनकारक; दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, नियमांत बदल करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 11:45 IST2024-12-20T11:44:35+5:302024-12-20T11:45:05+5:30

लाकडी बोटीत बिघाड झाल्यास ती अगदी कमी वेळेत बुडते. तर त्यातुलनेत स्टीलची बोट बुडायला जास्त वेळ लागतो. 

life jackets are mandatory administration wakes up after the boat accident decides to change the rules | लाइफ जॅकेट बंधनकारक; दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, नियमांत बदल करण्याचा निर्णय

लाइफ जॅकेट बंधनकारक; दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, नियमांत बदल करण्याचा निर्णय

महेश काेले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सागरी सफर करणाऱ्या पर्यटकांना आता लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. फेरीबोट दुर्घटनेनंतर प्रशासनाने नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बुधवारच्या दुर्घटनेतून धडा घेऊन फेरी बोट प्रवाशांसाठी लाईफ जॅकेट बंधनकारक करण्यात आल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाचे (एमएमबी) सीपीओ कॅप्टन प्रवीण खारा यांनी सांगितले. लाकडी बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लाईफ जॅकेट महत्त्वाचे आहे. कारण लाकडी बोटीत बिघाड झाल्यास ती अगदी कमी वेळेत बुडते. तर त्यातुलनेत स्टीलची बोट बुडायला जास्त वेळ लागतो. 

सागरी मंडळाबरोबरच मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जाऊ नयेत यासाठी नवी नियमावली (एसओपी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. बीपीटीचे डेप्युटी कन्झरवेटर कॅप्टन प्रवीण कुमार सिंग यांनी सर्व बोटचालकांना कोणत्याही परिस्थितीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीमध्ये नेऊ नयेत, असे आदेश दिले आहेत. 

आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी जेटी आणि बोटींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रवीण सिंग यांनी सांगितले. 

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन क्रमांकांचे पोस्टर चिकटवून जेटी आणि बोटींवर डिस्प्ले करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले.

लाइफ जॅकेट परिधान करावेच लागेल 

गेटवे ऑफ इंडियावरून मांडवा आणि एलिफंटादरम्यान दररोज सुमारे ९० पेक्षा अधिक अधिक लाकडी बोटी धावतात. यामधून दरवर्षी सुमारे ९ लाखांहून अधिक पर्यटक आणि प्रवासी गेटवे ऑफ इंडियावरून प्रवास करतात. आतापर्यंत बोटीत फक्त लाईफ जॅकेट ठेवण्याचा नियम होता. मात्र, बुधवारच्या दुर्घटनेनंतर जॅकेट स्वत:जवळ ठेवण्याऐवजी प्रवाशांना ते परिधान करणे बंधनकारक केले आहे.

‘गेट वे’वरील फेरीबाेट वाहतूक सुरळीत

बुधवारी घडलेल्या दुर्घटनेनंतर गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा प्रवासी जलवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाली. गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत १० ते १२ पर्यटक बोटी एलिफंटाकडे रवाना झाल्या असून त्यातून ६०० पेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संगितले. 

बोटी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ‘गेट वे’वर सुरक्षा तपासणी सुरू केली. बोटीतील प्रवाशांनी लाइफ जॅकेट घातले आहेत का, त्यांची उपलब्धता पुरेशी आहे का, बोटींमध्ये अतिरिक्त प्रवासी संख्या नाही ना, याची तपासणी केली जात होती. तसेच प्रवासी संख्यादेखील ६५ पेक्षा अधिक नसावी अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी बोटीचे मालकही तिथे उपस्थित होते. पर्यटनास आलेल्या पर्यटकांमध्ये बोट घटनेची भीती नसली तरी अलिबागच्या दिशेने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात बुधवारच्या दुर्घटनेनंतर भीती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईमध्ये आम्ही पर्यटनासाठी आलो आहोत. एलिफंटा लेणी पाहण्याचे आम्हाला गाइडने सुचवले होते. त्यामुळे भारतीय संस्कृती अनुभवण्यासाठी तसेच लाकडी बोटीतून अरबी समुद्रात फिरण्याचा आनंद घेण्यासाठी येथे आलो. - फिलिप्स जॉन्सन, विदेशी पर्यटक.

अलिबागवरून आम्ही कामानिमित्त रोज ये-जा करत असतो. बोटीवर लाइफ जॅकेट अशी सुरक्षा उपकरणे असतात. परंतु त्याचा वापर करण्याबाबत फारसे सांगण्यात येत नाही. पण यापुढे मी त्याचा रोज वापर करणार आहे. - योगेश नाकटे, प्रवासी

 

Web Title: life jackets are mandatory administration wakes up after the boat accident decides to change the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई