Join us

मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी पंतप्रधानांना पाठविणार पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:59 IST

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मराठीप्रेमी नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचे आवाहन मराठी एकीकरण समितीने केले आहे.

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मराठीप्रेमी नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचे आवाहन मराठी एकीकरण समितीने केले आहे. त्याचप्रमाणे, मराठीविषयक संस्था, संघटनांनाही अशा प्रकारे आवाहन करून जास्तीतजास्त लोकांनी यासाठी आग्रही भूमिका घेण्याची सूचना करण्यात आली आहे.पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात येणाऱ्या पत्राचा मथळाही एकीकरण समितीने तयार केला असून, त्यात केवळ प्रत्येकाने आपले नाव नोंदवून पंतप्रधान कार्यालयाला पाठवावे, असे म्हटले आहे. या मथळ्यात म्हटले आहे की, २०१२ पासून महाराष्ट्र राज्य मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करीत आहे. महाराष्ट्र सरकारने २०१३ मध्ये केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे अहवाल पाठविला होता. तो त्यांनी साहित्य अकादमीकडे निर्णयासाठी पाठविला होता.२०१४ मध्ये साहित्य अकादमीने मान्य करूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतची परवानगी केंद्र सरकारकडून अद्याप मिळालेली नाही. या विषयात वैयक्तिक लक्ष घालून १२ कोटी लोकांची मातृभाषा व अंदाजे २ हजार वर्षांपूर्वीच्या स्वयंभू मराठीभाषेला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा करण्यात यावी.