पश्चिम महाराष्ट्रात आघाडी नेस्तनाबूत करू
By Admin | Updated: August 12, 2014 23:14 IST2014-08-12T22:33:50+5:302014-08-12T23:14:47+5:30
देवेंद्र फडणवीस : कोडग्या सरकारला जागा दाखवा

पश्चिम महाराष्ट्रात आघाडी नेस्तनाबूत करू
कऱ्हाड : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला येत्या काळात आम्ही मोठा दणका देणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला आम्ही नेस्तनाबूत करू,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर तोफ डागली.
कऱ्हाड येथे सुरू असलेल्या लिंगायत समाजाच्या उपोषणास भाजपचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी मंगळवारी भेट देऊन चर्चा केली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाड दक्षिणमधून लढणार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राज्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. अनेक जण या परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात महायुती सर्व जागा लढवणार असून, त्या जिंकण्याच्या तयारीनेच आम्ही मैदानात उतरणार आहोत. कोडग्या सरकारला जनताच हिसका दाखवेल. आझाद मैदानात लिंगायत समाजाने मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी राज्याचे अनेक मंत्री तेथे पोहोचले. त्यांनी येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय सोडवण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, आजपर्यंत त्यांनी याबाबत काहीही केलेले नाही. राज्य सरकारने या समाजाची फसवणूक केली आहे.’ (प्रतिनिधी)
समाजाने नेहमीच शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला; पण राज्य शासनाकडून त्यांची निराशाच झाली. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना उपोषण करायला लावणारे हे सरकार खऱ्या अर्थाने कोडगे झाले आहे.
देवेंद्र फडणवीस
प्रदेशाध्यक्ष, भाजप