अमेरिकेच्या निर्णयावर विचार व्हावा
By Admin | Updated: June 30, 2015 01:03 IST2015-06-30T01:03:00+5:302015-06-30T01:03:00+5:30
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अमेरिकेच्या सर्व घटकराज्यांमध्ये समलैंगिक जोडप्यांना आता विवाह करता येण्याची संधी प्राप्त झाली आहे.

अमेरिकेच्या निर्णयावर विचार व्हावा
- टीम लोकमत
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अमेरिकेच्या सर्व घटकराज्यांमध्ये समलैंगिक जोडप्यांना आता विवाह करता येण्याची संधी प्राप्त झाली आहे. गेली अनेक दशके समलैंगिक व्यक्ती आपल्या हक्कांसाठी झगडत होत्या. त्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालाच, त्याहून त्यांना मोठा आनंदही झाला. समलैंगिकतेस बहुतांश वेळा विकृती किंवा काही तरी नवी फॅशन असे समजले जाते किंवा त्यास अनैसर्गिक असे म्हणून समलैंगिक व्यक्तींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. अमेरिकेतील या न्यायामुळे किमान अमेरिकेतील समलैंगिक व्यक्तींच्या मानवी हक्काचे रक्षण होणार असून त्यांना स्वत:चे ‘कुटुंब’ स्थापन करता येणार आहे. समलिंगी व्यक्ती या कुटुंब आणि समाजव्यवस्थेच्या विरोधात नाहीत हे त्यांच्या मागणीवरून सिद्ध होते. त्यांनाही आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या निर्णयाद्वारे ते लग्न करण्याचा मानवी मूलभूत अधिकार वापरू शकतील असे, न्यायाधीशांनी आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे.
अमेरिकेच्या या निर्णयापूर्वीच काही महिने आयर्लंडने सार्वमत घेतले. यामध्ये आयरिश नागरिकांनी बहुमताने समलैंगिक विवाहाला मान्यता दिली. आता अमेरिकेच्या या निर्णयावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. साहजिकच आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून तीव्र प्रतिक्रिया उमटतील. मात्र इतर अनेक देशांमध्ये या निर्णयामुळे विचारांना नवी सुरुवात होईल असे वाटते. भारतातही काही वर्षांपूर्वी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७७ विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमेरिकन न्यायालयाच्या निर्णयावर भारतीय तरुणाईला काय वाटते याचा वेध घेण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला आहे.
गेल्या शुक्रवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहास मान्यता देऊन अमेरिकेसह जगातील सर्वच समलिंगी व्यक्तींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमेरिकेत गेली ४७ वर्षे हा लढा सुरू होता. तिसऱ्या जगातील देशांनी समलैंगिक संबंधास अनैसर्गिक ठरविले आहे. भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया या निर्णयाकडे कसे पाहतात हे बघावे लागेल.
- प्रथमेश मस्कर, पत्रकार
निर्णयाचे स्वागत
‘समलिंगींच्या विवाहाला कायद्याने मान्यता देऊन अमेरिकेने विकसित देश असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य बहाल केले आहे. हा निर्णय देऊन अमेरिकेने यावर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. - सुरेखा जाधव, नोकरी
भारतात मान्यता मिळणे दुरापास्तच!
अमेरिकन सरकारने समलैंगिक विवाहांना मान्यता देण्याचा घेतलेला हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे. याआधाही अमेरिकेतील काही राज्यांमध्ये अशा विवाहांना मान्यता होती, ती आता संपूर्ण अमेरिकेत लागू झाली आहे. अमेरिकेत अजूनही काही लोकांचा याला विरोध आहे, पण सरकारने जर याला मान्यता दिली, तर सामान्यही मंजुरी देतीलच. पण भारतात मात्र अशा विवाहांना परंपरांच्या जोखडामुळे मान्यता मिळणे दुरापास्तच वाटते.
- प्रशांत साळवे, आयटी कर्मचारी
मानवतेकडे पुढचे पाऊल
अमेरिकेसारख्या देशाला जर समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यासाठी २०१५ साल उजाडावे लागत असले तरी त्यांनी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय मानवतेकडे टाकलेले पुढचे पाऊलच म्हणावे लागेल. समलैंगिक जोडप्यांनाही सामान्यांप्रमाणे विवाहसुख, संसार यांचा आनंद उपभोगण्याचा अधिकार आहे, जो कुणीही त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मानवतेचा हा विजय आहे.
- सुबोजित साहा, आयटी कर्मचारी
वैचारिक
स्वातंत्र्य आवश्यक
कोणी कोणावर प्रेम करावे, कोणासोबत राहावे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. समलैंगिक व्यक्तींच्या भावनांचा विचार अमेरिकेने उशिराने का होईना केला आहे. भारतात अशा प्रकारचे वैचारिक स्वातंत्र्य येण्यास अजून किती कालावधी जाईल हे सांगता येत नाही. पण अशा क्रांतिकारी विचारांची आवश्यकता आपल्या देशात निर्माण झाली आहे.
- जान्हवी जोशी, गृहिणी