Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व कामांना लेटमार्क, नागरिकांच्या तक्रारी; अनेक नाले अद्याप कचऱ्याने तुंबलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 09:32 IST

मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबई : मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र, मरोळ गावातील नाल्यातील नागरिकांनी तुंबलेल्या कचऱ्याचा फोटोच व्हायरल केला आहे. कामांचा संथ वेग पाहता कामे मुदतीत पूर्ण होण्याबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

पालिकेचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे कामांना लेटमार्क लागत असला तरी ही अत्यावश्यक कामे पावसाआधी पूर्ण न झाल्यास फटका नागरिकांना बसू शकतो, अशी भीती वॉचडॉग फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने व्यक्त केली आहे.

पालिकेने मिठी नदी तसेच नाल्यांच्या सफाईचे २४९.२७ कोटी रुपयांचे काम ३१ कंत्राटदारांना दिले आहे. गेल्यावर्षी नालेसफाईला मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. मात्र, यंदा १८ मार्चपासून नालेसफाईला सुरुवात झाली आहे. मात्र, ही कामे संथगतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी ही कामे सुरूच झालेली नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. हीच परिस्थिती राहिली तर पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती वॉचडॉग फाउंडेशनने  व्यक्त केली.

पावसाळापूर्व कामे पालिकेने युद्धपातळीवर हाती घेणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा असली तरी या तोडगा प्रशासनाने काढणे आवश्यक आहे. मुंबईत पावसाआधी ही कामे न झाल्यास जनजीवन विस्कळीत होऊ शकते. - गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग फाउंडेशन

निवडणूक ड्युटीचा फटका-

१)  लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेचे असे एकूण ७० टक्के कर्मचारी जात आहेत. मुंबई महापालिकेचे एकूण १ लाख २ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. 

२)  पालिकेच्या विविध विभागाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. यात रस्ते, पूल, पर्जन्य जलवाहिनी, मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा प्रमुख विभागातील कर्मचारी वर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त होणार असल्याने या कामांवर परिणाम होत आहे. २० मेनंतर नालेसफाईच्या कामाला वेग येईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकामोसमी पाऊस