Join us

दिव्यातील ज्योतीपासून प्रेरणा घेऊ या, अंधार दूर करू या!; दा. कृ. सोमण यांनी सांगितले दीपावलीचे महत्त्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:13 IST

दिवाळीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून, सर्वत्र चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘शेतातील धान्य घरात आल्याने घर संपन्न झालेले असते. चिंता, दु:ख सारे विसरून जीवन आनंदमय करण्याचा हा एक उत्सव असतो. दीप जसा अंधार दूर करतो, तसेच त्यापासून प्रेरणा घेऊन दीपावलीच्या निमित्ताने आपण आपल्या मनातील, जीवनातील अंधार दूर करायचा असतो. आपले आयुष्य आपण दिव्यासारखे जगायचे असते.

दीपावलीचा सणही दरवर्षी हेच सुचवित असतो. दिव्यातील ज्योतीपासून प्रेरणा घेऊन या सर्व गोष्टी आपल्या कल्याणासाठी आपल्यालाच करावयाच्या आहेत,’ असे आवाहन पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केले. दिवाळीला सोमवारपासून प्रारंभ झाला असून, सर्वत्र चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे.

झाडूची पूजा 

अलक्ष्मीचे वाहन गाढव असून, तिच्या हातात झाडू आहे. अलक्ष्मी म्हणजे कलह, अस्वच्छता ही आपल्या घरात राहू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक झाडूची पूजा करतात. लक्ष्मी-अलक्ष्मीसंबंधी एक कथा आहे. 

लक्ष्मी-कुबेरपूजन 

२१ ऑक्टोबरला लक्ष्मी-कुबेरपूजन आणि अलक्ष्मी निस्सारण आहे. या दिवशी प्रदोषकाळी सायंकाळी ६:११ ते रात्री ८:४० या काळात लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे. सन्मार्गाने मिळविलेला आणि सन्मार्गाने खर्च होणाऱ्या संपत्तीला लक्ष्मी असे म्हणतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. नवीन वस्त्रालंकार घालून आनंदोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मी-कुबेर यांची पूजा करावयाची असते. व्यापारी हिशेबांच्या वह्यांवर ‘श्री’ लिहून वहीचे पूजन करतात. 

आज लक्ष्मीपूजन कधी करावे? 

आदल्या दिवशी प्रदोषकाळी आश्विन अमावास्या असेल आणि दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा जास्त काळ आश्विन अमावास्या असेल. प्रतिपदा जास्त काळ असेल तर दुसऱ्या दिवशी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करावे. त्याप्रमाणे २१ ऑक्टोबरला सायंकाळी ६:११ ते रात्री ८:४० या काळात लक्ष्मीपूजन करावे.

बलिप्रतिपदा 

२२ ऑक्टोबर : हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. या दिवशी बळीची पूजा करावयाची असते. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते.

यमद्वितीया- भाऊबीज

२३ ऑक्टोबर : या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण त्याला ओवाळते. भाऊ तिला भाऊबीज देतो. बहीण-भावातील नाते दृढ करणारा हा दिवस असतो.  

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali: Light the lamp, dispel darkness, says D.K. Soman.

Web Summary : Diwali signifies dispelling darkness, embracing joy. Da. Kru. Soman highlights Lakshmi-Kuber Pujan on October 21st, emphasizing ethical wealth. Bali Pratipada is on October 22nd, and Bhau Beej on October 23rd, strengthening sibling bonds.
टॅग्स :दिवाळी २०२५दिवाळीतील पूजा विधीलक्ष्मीपूजनअध्यात्मिक