अध्यक्ष करू नका ‘सत्तापद’ द्या, केळकरांचा घोषा
By Admin | Updated: June 29, 2015 04:48 IST2015-06-29T04:48:36+5:302015-06-29T04:48:36+5:30
पावणेदोन वर्षापासून भाजपाच्या ठाणे शहराध्यक्ष पदाचे भिजत घोंगडे होते, प्रदेशाध्यक्षांनी आमदार संजय केळकर यांना ते पद दिले तरी हा प्रश्न सुटला नसून तो अधिकच गंभीर झाला आहे.

अध्यक्ष करू नका ‘सत्तापद’ द्या, केळकरांचा घोषा
अनिकेत घमंडी, डोंबिवली
पावणेदोन वर्षापासून भाजपाच्या ठाणे शहराध्यक्ष पदाचे भिजत घोंगडे होते, प्रदेशाध्यक्षांनी आमदार संजय केळकर यांना ते पद दिले तरी हा प्रश्न सुटला नसून तो अधिकच गंभीर झाला आहे. केळकर मात्र आय एम अ सोल्जर, आॅफिसर आॅन स्पेशल ड्यूटी असे सांगून ‘स्वयंसेवक’त्वाची भूमिका मांडण्यात दंग आहेत. परंतु रामभाऊ म्हाळगींचे संस्कार-सहवास लाभलेल्या, तसेच पंचवीसहून अधिक वर्षे पक्षात विविध स्तरावर काम करुनही त्यांना हे का सांगावे लागत आहे असा सवाल ‘ठाण्यातील परिवारा’मधून उपस्थित होत आहे.
कोकण प्रांतासह दोन वेळा आमदारकी मिळवल्यानंतरही त्यांना शहरअध्यक्षपद देत त्यांची मंत्रीपदाच्या शर्यतीतून बोळवण केली का? अशीही चर्चा आहे. विविध नाराजींना एकत्र घेऊन गटातटाचे राजकारण थोपवत पक्षाला बळकटी देणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असून त्यांच्या अनुभवाची कसोटी लागणार आहे.
मला नको हे पद असे प्रदेशाध्यक्षांना घातले साकडे
> हे पद दिल्याचे समजताच केळकरांनी तातडीने धाव घेत, प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली, मला हे पद नको, अनेक अनुभवी-जुने कार्यकर्ते आहेत त्यांना द्यावे असे साकडेही घातले, मात्र याबाबत दाद मागायची असेल तर दिल्लीत पक्षाध्यक्षांकडे जा असे स्पष्ट सांगितल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
> येणा-या ठाणे महापालिकेच्या निवडणूका स्वबळावर लढा, वस्तुस्थितीचा अभ्यास करून किमान ३५ नगरसेवक निवडून आणणे हे लक्ष्य असावे, जेणेकरुन स्थायीमध्ये ४ सदस्य पक्षाचे जातील. पक्षाचे अस्तीत्व टिकवण्याची आणि बळकटी देण्याची ही एकमेव संधी आहे. बदलापूर-अंबरनाथमध्ये स्वबळावर लढल्यानेच अस्तीत्व वाढले आहे, हे लक्षात घेत युती नकोच अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
> विधानसभा निवडणूकीत केळकरांना ७० हजार तर संदिप लेलेंना सुमारे ४९ हजार मते मिळाली होती, त्यामुळे शहरात भाजपाचा असा स्वत:चा मतदार आहे, पण त्यासाठी योग्य ते निर्णय घेणे आवश्यक असून त्यांनी स्थायीच्या वेळेला जशी ‘नांगी’ टाकली तसे करु नये, ठामपणे निर्णय घ्यावा असेही कार्यकर्त्यांचे मत आहे.