मुंबई - माघी गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या पीओपीच्या गणेशमूर्तींचे शांततेत मंगळवारी विसर्जन करू द्यावे, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि याबाबतची मूर्तिकार संघटनेची बाजू सरकारने न्यायालयात मांडावी, अशा मागण्या गणेश मूर्तिकार संघटनेच्या बैठकीत रविवारी करण्यात आल्या. या बैठकीसाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार मात्र उपस्थित राहू शकले नाहीत.
माघी गणेशोत्सवानिमित्त मंडळांनी २६ जानेवारीलाच गणेशमूर्ती मंडपात नेऊन ठेवल्या होत्या. त्यानंतर पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जित करता येणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी मंडपाबाहेर काढलेल्या गणेशमूर्ती पुन्हा जागेवर ठेवल्या. मात्र त्या वर्षभर ठेवू शकणार नाही. त्यामुळे सरकारने येत्या मंगळवारी शांततेत विसर्जन करू द्यावे, अशी मागणी गणेश मंडळे आणि मूर्तिकार संघटनांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली. अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सरकारने मूर्तिकारांची बाजू न्यायालयात मांडावी
राज्य सरकारने मूर्तिकार संघटनेचे म्हणणे आणि पीओपी गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही ही बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडावी. पीओपी गणेशमूर्तींवर बंदी आणल्यास महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेला गणेशोत्सव बंद होईल. हजारो मूर्तिकार आणि कामगार रस्त्यावर येतील. त्यातून या उद्योगामुळे होणारी ७० ते ८० हजार कोटींची उलाढाल ठप्प होईल. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांमध्ये आमची बाजू भक्कमपणे मांडावी आणि मूर्तिकारांच्या व्यवसायावर येणारी गदा थांबवावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
पीओपी गणेशमूर्ती पर्यावरणपूरकच
पीओपीच्या गणेशमूर्ती या पर्यावरणपूरकच असून त्याचे विघटन होते. मुळात त्या पाण्यात विसर्जितच केल्या जात नाहीत. त्या पुन्हा काढून घेण्यात येत असल्याने त्यांचा पुनर्वापर केला जातो. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने पीओपीच्या गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नसल्याचा निर्वाळा दिला आहे. जर पीओपीमुळे प्रदूषण होत असेल तर ते केवळ ०.२ टक्के इतके आहे. त्या तुलनेत रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषित पाण्यापासून होणारे प्रदूषण कित्येक पटीने आहे. त्यामुळे सरकारने आधी त्यावर निर्बंध आणावेत. केवळ हिंदूंचा सणांवर निर्बंध आणू नयेत, अशी भूमिका मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी या वेळी मांडली.