मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा...
By संदीप प्रधान | Updated: October 13, 2025 10:31 IST2025-10-13T10:30:48+5:302025-10-13T10:31:43+5:30
राज्य सरकारची दुकाने अहोरात्र उघडी असण्याची कितीही तीव्र इच्छा असली तरी ग्राहक व दुकानदार यांची तशी अजिबात इच्छा नाही.

मला जाऊ द्या ना दुकानी, आता वाजले की बारा...
मध्यरात्रीचे अडीच वाजले आहेत. सर्वत्र किर्र काळोख आहे. एखादी ओला अंगात वारं भरल्यासारखी सुसाट पळून जातेय. पावभाजी-अंडाभुर्जीच्या गाड्या नुकत्याच थंडावल्यात. रस्त्यावरील कुत्री गटागटाने भुंकत आहेत. अशावेळी टॉवरच्या पस्तिसाव्या मजल्यावरून एक जोडपे खाली उतरले. त्यांनी दुचाकी काढली अन् भुर्रकन सोनाराची नामांकित पेढी गाठली. दुकानात अजिबात गर्दी नव्हती. ग्राहक आल्याने पेंगुळलेले कर्मचारी डोळे चोळून पटापट सोन्याचे हार दाखवू लागले. पत्नीने डझनभर हार गळ्यात घालून पाहिल्यावर एक पसंत केला. नवऱ्याने सोबत आणलेल्या बॅगेतून पंचवीस-तीस लाख मोजले. दोघे पुन्हा दुचाकीवर आरूढ झाले आणि घरी पोहोचले तेव्हा मध्यरात्रीच्या सुवर्ण खरेदीच्या ‘ॲडव्हेंचर’चे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.
राज्यातील दुकाने चोवीस तास उघडी ठेवण्याच्या महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमातील तरतुदीबाबत कामगार विभागाने अलीकडेच स्पष्टीकरण देणारे परिपत्रक जारी केले. चोवीस तास दुकाने उघडी ठेवण्याबाबत यापूर्वीच तरतूद केली आहे. परंतु, आजही रात्री नऊ वाजता सोनाराची पेढी बंद होते. कपड्याच्या दुकानाचे शटर १० वाजता खाली ओढले जाते आणि केशकर्तनालयातील दिवे ११ वाजता मालवले जातात. राज्य सरकारची दुकाने अहोरात्र उघडी असण्याची कितीही तीव्र इच्छा असली तरी ग्राहक व दुकानदार यांची तशी अजिबात इच्छा नाही. ज्या किराणा दुकानात मालक व नोकर पुड्या बांधतात व पत्नी गल्ला सांभाळते, त्या दुकानाला सोमवारी सुटीच असते. एकटी व्यक्ती जे मेडिकल स्टोअर सांभाळते, ती रविवारी सुटीची गोळी घेतेच. दुकाने चोवीस तास उघडी ठेवायला परवानगी दिली तरी त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना किती तास काम करायला लावले जाते, त्यांना सुटी मिळते की नाही? अशा बाबींवर लक्ष ठेवणारी दुसरी व्यवस्था असते.
रात्रभर दुकाने सुरू ठेवायची, कामगारांना साप्ताहिक सुटी द्यायची आणि नियमानुसार कामाचे तास भरायला लावायचे तर सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करावी लागेल. वेतन, विजेचा वापर व इतर खर्च याचा विचार करता रात्री दुकानात खरेदीला ग्राहक येणार असेल तर हा खर्च करणे परवडेल. अन्यथा केवळ सरकारची इच्छा आहे म्हणून कुणीही दुकान सुरू ठेवणार नाही. दिवसाढवळ्या ज्या गोष्टींची खरेदी होते अशी कपडालत्ता, सोने-चांदी, भांडीकुंडी, मोबाइल व इलेक्ट्रॉनिक वस्तू, किराणा सामान यांची दुकाने रात्री उघडी राहणारच नाहीत. मुंबई महानगरातील हॉटेल, ज्युस सेंटर, आइस्क्रीम पार्लर वगैरेकरिता हा निश्चित स्वागतार्ह निर्णय आहे. आयटी, कॉल सेंटर वगैरे असलेल्या भागातील हॉटेलांना व ग्राहकांना या निर्णयामुळे निश्चित दिलासा लाभेल. मात्र, सरसकट सर्व भागातील हॉटेल, आइस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहक पायधूळ झाडतील ही अपेक्षा करणे चुकीचे आहे.
बाहेरचे दिवे बंद अन् आत मात्र पेगवर पेग रिचवणे चालू
रात्रीच्या वेळी परमिट रूम, हुक्का पार्लर येथे गर्दी असते. रात्री १२ वाजल्यानंतर बार, वाइन शॉप, हुक्का पार्लर बंद करण्याचे बंधन सरकारने कायम ठेवले आहे. मात्र, रात्री १२ नंतर या ठिकाणी असलेले बाहेरील दिवे बंद केले जातात. बाहेरील सुरक्षा रक्षक शटर खाली ओढतो आणि आतमध्ये मध्यरात्री दोन-अडीच वाजेपर्यंत ग्राहक दारू ढोसत असतात. पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी आली की, सुरक्षा रक्षक वॉकीटॉकीवर आतमध्ये संदेश देतो. मग, दिवे पूर्ण बंद केले जातात. बरेचदा पोलिसांची गाडी दारूच्या बाटल्या, बिर्याणी वगैरे पार्सल करून घेऊन जाते. कामगार विभागाने पोलिसांचे हप्ते व दारू-बिर्याणी बंद होऊ नये याची चोख काळजी घेतली आहे.