सरकारकडून निधी खेचून आणू!
By Admin | Updated: January 30, 2015 22:44 IST2015-01-30T22:44:28+5:302015-01-30T22:44:28+5:30
रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्ह्याच्या विकास आराखड्यात निधी कमी पडला तर

सरकारकडून निधी खेचून आणू!
अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्ह्याच्या विकास आराखड्यात निधी कमी पडला तर पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून तो आणणार, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी येथे व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा नियोजन आराखड्यात विकासासाठी पुरेसा निधी नसल्याने लोकमतने ३० जानेवारीच्या अंकात ‘जिल्ह्याचा विकास मंदावणार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. तोच धागा पकडून पालकमंत्र्यांनी विकासाबाबत तडजोड केली जाणार नाही. निधी मिळविण्यासाठी पुरवणी मागणीमध्ये अनुमती घेण्यात येईल, असे मेहता यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्याच्या २१७ कोटी ६० लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मेहता यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी दिली. या बैठकीला निर्णयक्षम अधिकारी गैरहजर असल्याने ही बैठक स्थगित करण्यात आली. लवकरच नियोजन समितीची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत गैरहजर असलेल्या बाबूंची झाडाझडती घेणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. रायगडच्या विकासाला आवश्यक असणारा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, निधीअभावी कोणतीच कामे अडणार नाहीत, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या बैठकीला लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील विविध अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)