रेबीज नियंत्रणासाठी पालिका देणार धडे, महानगरपालिका व मिशन रेबीज संस्‍थेचा पुढाकार

By सीमा महांगडे | Published: December 10, 2023 06:51 PM2023-12-10T18:51:50+5:302023-12-10T18:52:05+5:30

मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प

Lessons to be given by municipality for rabies control, initiative of municipal corporation and mission rabies organization | रेबीज नियंत्रणासाठी पालिका देणार धडे, महानगरपालिका व मिशन रेबीज संस्‍थेचा पुढाकार

रेबीज नियंत्रणासाठी पालिका देणार धडे, महानगरपालिका व मिशन रेबीज संस्‍थेचा पुढाकार

मुंबईश्‍वान रेबीज नियंत्रण धोरणाच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई महानगरपालिका व मिशन रेबीज संस्‍थेच्‍या वतीने ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२३ दरम्‍यान गोवंडी येथील देवनार पशुवधगृह सभागृह येथे कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली आहे. या तीन दिवसीय कार्यशाळेत रेबीज नियंत्रण याबरोबरच श्वान पकडणे, प्राणी कल्याण कायदे, श्‍वानांच्‍या सामूहिक लसीकरणाची रणनीती आणि प्रमाणित कार्यपद्धती या विषयांवर तज्‍ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने २०३० पर्यंत भटके प्राणी विशेषतः श्वानांपासून होणा-या रेबीज रोगाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने मिशन रेबीज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार, दरवर्षी मुंबईतील सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांचे रेबिज लसीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी दोन्ही संस्था नि:शुल्क सेवा देणार आहेत.

मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प
सप्टेंबर २०२२ मध्ये महानगरपालिका पशुवैद्यकीय आरोग्य विभागाने रेबीजमुळे होणारे मानवी मृत्यू रोखण्यासाठी 'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प' सुरू केला. या प्रकल्पांतर्गत भटक्या श्वानांचे सामूहिक लसीकरण, जनजागृती मोहीम, सार्वजनिक आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण आणि विविध क्षेत्रातील भागधारकांशी संलग्नता आदी उपक्रम राबविले जातात. सन २०३० पर्यंत मुंबईला रेबीज - मुक्त दर्जा प्राप्त करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्‍ट असल्याची माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीम पाशा पठाण यांनी दिली.

या सगळ्याच्या पार्श्भूमीवर ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता या कार्यशाळेचे उदघाटन होणार आहे. वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश वानखेडे उपस्थितांचे स्‍वागत करतील 'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्‍प' या विषयावर डॉ. एस. एल. कुलकर्णी मार्गदर्शन करतील. वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा आर. तातेलू या रेबीज टास्क फोर्स आणि हाफकिन संस्थेचे प्रतिनिधी ‘एनएपीआरई’ मार्गदर्शक तत्त्वे या विषयांवर व्‍याख्‍यान देतील. मीत आशर हे पशू कल्याण आणि प्राणी कल्याण कायदे, डॉ बालाजी चंद्रशेखर हे रेबीज नियंत्रण, मुरुगन अप्‍पूपिल्लई हे रेबीज नियंत्रण जागरूकता, डॉ. एल. बी. सरकटे हे नसबंदी अंतर्गत प्राण्यांचे आरोग्य आणि कल्याण सुरक्षित करणे, डॉ. निवास यादव हे श्‍वानांच्‍या सामूहिक लसीकरणाची रणनीती आणि प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी), नमिता नायर या रेबीज हेल्पलाइन व्यवस्थापन या विषयांवर संबोधित करतील.

Web Title: Lessons to be given by municipality for rabies control, initiative of municipal corporation and mission rabies organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.